आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी मंदिरात प्रवेशासाठी भाविकांना लागणार अॅक्सेस कार्ड, असे तयार होते कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन भक्तनिवाससमोर अॅक्सेस कार्ड घेण्यासाठी भाविकांची रविवारी रांग लागली होती. - Divya Marathi
नवीन भक्तनिवाससमोर अॅक्सेस कार्ड घेण्यासाठी भाविकांची रविवारी रांग लागली होती.
तुळजापूर - जिल्हाधिकाऱ्यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासनात सुधारणांना वेग दिला आहे. रविवारपासून (दि.१०) तुळजाभवानी मंदिरात प्रवेशासाठी भाविकांना बायोमेट्रिक ओळखपत्र (अॅक्सेस कार्ड) सक्तीचे करण्यात आले असून हे ओळखपत्र घेऊनच प्रवेश देण्यात येत आहे. 
 
केंद्र सरकारच्या माध्यमातून यासाठी लागणारे मनुष्यबळ, २४ मशिन इतर साहित्य पुरविण्यात आले आहे, असे व्यवस्थापक तहसीलदार सुनील पवार यांनी सांगितले. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे रविवारी सकाळी भक्तांसह पुजारी वर्गात गोंधळ उडाला. तुळजाभवानी मंदिरात रविवारी सकाळी भाविकांसह पुजाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी महाद्वारातच अडवून ओळखपत्राची मागणी केली. भाविकांनी चौकशी केल्यावर नवीन भक्त निवासातून ओळखपत्र घेण्यास सांगण्यात आले. या ठिकाणी मंदिर संस्थानच्या वतीने बायोमेट्रिक ओळखपत्राची व्यवस्था करण्यात आली. गर्दीचे व्यवस्थापन आणि दर्शनरांगांच्या नियंत्रणासाठी अॅक्सेस कार्ड गरजेचे असल्याचे व्यवस्थापक तहसीलदार पवार यांनी सांगितले. 
 
सुधारणांचा धडाका : जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पदभार स्वीकारताच पेड दर्शन, पूजेच्या करात वाढ, देवी दर्शनानंतर बाहेर पडण्यासाठी नवीन दरवाजा आदी निर्णय घेतल्याने भाविकांची सुविधा वाढण्यासोबतच मंदिर संस्थानच्या उत्पन्नवाढीसाठी या निर्णयाचा लाभ झाला आहे. 
 
क्राउड अँड क्यू मॅनेजमेंट 
प्रत्येक भाविकाला बायोमेट्रिक ओळखपत्र देऊनच मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. यामुळे मंदिर मंदिराबाहेरील एकूण भाविकसंख्येचा अंदाज येऊन मंदिर व्यवस्थापनाला ‘क्राउड अँड क्यू मॅनेजमेंट’ करण्यास मदत होणार आहे. मंदिरातील भाविकसंख्या बघून बाहेरून भाविकांना सोडण्यात येणार आहे. तसेच दररोजच्या भाविकसंख्येची अचूनक नोंद यामुळे शक्य होणार आहे. 
 
पारंपरिक पद्धतीने मांसाहारी नेवैद्य सुरूच राहणार 
दरम्यान, हे ओळखपत्र निशुल्क आहे. मंदिरात दारू बाळगणे, धुम्रपान, अंडी, मांसाहारवर बंदी आदी सूचना या ओळखपत्रावर आहेत. परंतु तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने मांसाहारी नेवैद्य दाखवण्यात येत असल्याने पुजारी, भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.त्यांनी धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्याशी संपर्क साधला असता तुळजाभवानी मंदिरात मांसाहारी नेवैद्य सुरूच राहणार, असे त्यांनी सांगितले. ही कार्ड केंद्राकडून छापून आल्याने त्यामध्ये ही सूचना आहे. परंतु ती येथे लागून होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
वैद्यकीय सेवा हिरकणी कक्ष 
नवरात्रोत्सवाततळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी वैद्यकीय सुविधा, हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मंदिर परिसरात ठिकठिकाणी पाच जागी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...