आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूगर्भातील आवाज ‘रिचार्ज’मुळे; भविष्यातही येण्याची शक्यता,धोका नाही; न घाबरण्याचे नागरिकांना आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - चार वर्षांपासून बेसुमार पाण्याच्या उपशामुळे रिकामा झालेला भूगर्भ आता ‘रिचार्ज’ होत आहे. भूगर्भातील विशाल पोकळ्यांमध्ये पाणी भरले जात असल्यामुळे तेथील हवा बाहेर पडत आहे. यामुळेच जिल्ह्यात काही ठिकाणी गूढ आवाजांची मालिका सुरू आहे. भविष्यातही अशा प्रकारचे आणखी आवाज येण्याची शक्यता आहे. मात्र, याचा कसलाही धोका नसल्याचे भूवैज्ञानिक विभागाचे मत आहे.

पाझरण्याचा वेग अधिक
चार वर्षांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. धरण, साठवण तलाव, विहिरींसह अन्य जलसाठे कोरडे ठाक पडले होते. पाऊस पूर्णपणे गायब झाला होता. यामुळे जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याच्या उपसा करून गरज भागवण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. शेती पिण्याच्या पाण्यासाठी भूगर्भातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा उपसा झाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने नगदी पीक असलेल्या उसासाठी तर बेसुमार पाण्याचा उपसा पहिल्यापासूनच होत आहे. यामुळे अगाेदरच मोठ्याप्रमाणात पाण्याचा उपसा झाला. साधारणपणे १५ वर्षांपूर्वी दोनशे ते तीनशे फुटापर्यंत कूपनलिका खोदल्यावर पाणी लागत होते. मात्र, नंतरच्या कालावधीत ८०० ते ९०० फुटापर्यंत कूपनलिका खोदून पाणी उपसण्यात आले. यातून शेकडो वर्षांपासून जतन झालेल्या पाण्याचा उपसा करण्यात आला.

जमिनीच्या आतील रचनेमध्ये मोठ्याप्रमाणात पोकळ्या आहेत. मानवी शरीरात धमण्यांप्रमाणे या पोकळ्यांचे जाळे जमिनीत आहे. याच पोकळ्यांमध्ये पाणी साठून राहत असते. या पोकळ्यांवर कूपनलिका खोदून त्यातील पाणी उपसण्यात आल्यामुळे हा साठा संपला. या प्रक्रियेमध्ये अनेक पोकळ्या पूर्णपणे रिकाम्या झाल्या. आता या पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. यामुळे हे पाणी आता जमिनीमध्ये वेगाने पाझरत आहे. चार वर्षांपासून शुष्क झालेले जमिनीतील मातीचे थर मोठ्याप्रमाणात पाणी ओढून घेत आहेत. यामुळे रित्या झालेल्या पोकळ्यापर्यंत पाणी वेगाने पाेहोचत आहे. पाण्याने पोकळ्या भरल्यानंतर त्यातील हवा एकत्रितपणे वेगाने बाहेर पडत आहे. फुगा फुटल्यानंतर विशिष्ट क्रिया घडून मोठा आवाज होतो. तसेच जमिनीतील मोकळी झालेली हवा बाहेर पडून आवाजाची निर्मिती होत आहे, असा निष्कर्ष भूवैज्ञानिक विभागाचा असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम. एस. शेख यांनी सांगितले.

‘एक्युस्टिकइम्मिशन’ :नागपूरच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वेक्षण केले हाेते. ‘एक्युस्टिक इम्मिशन’ या संकल्पनेतून अावाज कसा निर्माण होतो, याचा अहवाल त्यांनी सादर केला आहे. ‘एक्युस्टिक इम्मिशन’ अर्थात ध्वनियुक्त उत्सर्जन त्यांनी अहवालात विषद केले आहे. पोकळीतील पाणी बाहेर काढताना पोकळीत पाणी जातानाही असा आवाज येतो. यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी उपसा होत असताना आता पाणी उपलब्ध झाल्यावर त्यात पाझरतानाही आवाज होत असल्याचे अहवालात नमूद आहे.

यामुळे सर्वत्र आवाज :जिल्ह्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी भूगर्भातून आवाज येतो. अगदी जवळूनच आवाज आल्याचे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी जाणवते. जमिनीखालील बहुतांश पोकळ्या लांबीने मोठ्या असतात. एखाद्या मोठ्या आकाराच्या पोकळीची लांबी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक असू शकते. काही पोकळ्या लहान असल्यातरी एकमेकांना कोठेतरी जुळतात. यातून एकदम हवा बाहेर पडते. ही हवा प्रत्येक कूपनलिका, सुप्त फटीतून बाहेर पडते. यामुळे सर्वत्र एकाच तीव्रतेचा आवाज येतो. तसेच यावेळी कसलेही कंपने जाणवत नाहीत. मंगळवारी दुपारी जाणवलेला आवाज आतापर्यंतचा सर्वात मोठा आवाज होता.

धोका नाही
भूगर्भातील आवाजामुळे जनतेने घाबरून जाऊ नये. आवाज केवळ हवेशी संबंधित आहे. जमिनीत यामुळे काेणतेही बदल होत नाहीत. यामुळे भूपृष्ठावर कोणालाच धोका होणार नाही. -एम.एस. शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक.

जमिनीत हालचाल नाही
भूगर्भातून येणाऱ्या आवाजामुळे जमिनीत कोणतीही हालचाल होत नाही. केवळ पोकळी हवा यांच्या संबंधातून आवाज येत असतो. यामुळे कोणत्याही भूकंपमापक केंद्र अथवा शासकीय यंत्रणेकडे अावाजाची नोंद होत नाही. तसेच आवाजाचे संवहन करण्यासाठीही जमिनीच्या कोणत्याच थराचा उपयोग होत नाही.यामुळे भूपृष्ठावर याचा कोणताही धोका नसल्याचाही दावा भूवैज्ञानिकांनी केला आहे.

पाझरण्याचा वेग अधिक
चार वर्षांतील दुष्काळामुळे जमिनीमध्ये कोरडेपणा आला आहे. यामुळे पाणी शोषून घेण्याची गती अधिक आहे. पाझर तलावांची वाढलेली संख्या, जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेले सुमारे १३००० रिचार्ज शाॅफ्ट, जलयुक्त शिवार अभियानाची कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरण या कामांमुळे जमिनीमध्ये पाणी पाझरण्याची गती अधिक आहे.

आणखी आवाजाची शक्यता
पूर्वीच्या बेसुमार पाणी उपशामुळे अनेक पोकळ्या रिकाम्या आहेत. यामध्ये पाणी पाझरत जाऊन आणखी आवाज येण्याची शक्यता आहे. अशा वेळी कोणीही घाबरून जाऊ नये, असेही आवाहन भूवैज्ञानिक विभागाकडून करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...