आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: बहुसदस्यीय प्रभाग; चारवेळा मतदान, ही घ्या काळजी ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा महापालिकेसाठी चार जागांचा एक अशी प्रभागरचना असल्याने एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु, अनेक मतदारांना ही मते कशी द्यायची किंवा कुठल्याही एकाच उमेदवाराला किंवा चारपैकी अथवा तीनपैकी (जेथे तीन सदस्यांचा प्रभाग आहे) दोघांना मत द्यायचे नसेल तर काय करायचे, मतदान प्रक्रिया कशी असेल, माझे मत बाद होईल का, असे अनेक प्रश्न सतावत आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने करण्यात आलेला हा प्रयत्न... 
 
मतदान केंद्रात अथवा कक्षात गेल्यावर प्रथम काय करावे? 
-मतदाराने केंद्रात प्रवेश केल्यानंतर मतदानाचे ओळखपत्र दाखवावे. ते नसेल तर आयोगाने सांगितलेल्या १७ पुराव्यांपैकी कुठलेही एक फोटो ओळखपत्र सादर करावे. त्यानंतर तेथील कर्मचारी मतदान यादीत नाव शोधून संबंधित मतदाराच्या बोटाला शाई लावून मतदान यंत्र ठेवलेल्या कक्षात पाठवेल. 

प्रत्यक्ष मतदान कसे करावे किंवा पद्धत कशी असेल? 
-मतदान केंद्रात मतदार गेल्यानंतर मतदान केंद्र प्रमुख अर्थात मतदान अधिकारी कंट्रोल युनिटवरचे बॅलेट युनिटचे बटन दाबेल. त्यानंतर मतदाराला आपले मत देता येईल. 
 
मतदान केंद्रात किती यंत्रे असतील? 
-
उमेदवारांच्या संख्येनुसार मतदान यंत्रे असतील. चार किंवा दोन बॅलेट युनिट असतील. 
 
मतपत्रिका कुठल्या रंगाच्या असतील? 
-मतपत्रिका या चार जागांच्या ठिकाणी चार रंगाच्या, तर तीन जागा असलेल्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या रंगांच्या असतील. (अ- पांढरी, ब- फिकट गुलाबी, क- फिकट पिवळा, ड- फिकट निळा या रंगाच्या मतपत्रिका असतील.) 
 
युनिट हे यंत्र असेल की मतपत्रिका ? 
-
मतदानासाठी मतदान यंत्र हे युनिट राहणार नाही, तर मतपत्रिका हे युनिट असेल. त्यामुळे एका यंत्रावर दोन मतपत्रिका असू शकतील. त्यामुळे तेथे एकाच बॅलेटवर दोन मतपत्रिका असल्याने दोन बटने दाबता येतील. पण जेथे एका बॅलेटवर एकच मतपत्रिका असेल तेथे एकच बटन दाबता येईल. त्यासाठी उमेवारांची संख्या महत्त्वाची असेल. एक बॅलेट युनिटवर १६ बटने असतात. शेवटचे बटन लॉक असते. त्यानंतर उमेदवारांची यादी संपल्यानंतर त्याच्या खालचे एक बटन हे ‘नोटा’चे (नकारात्मक मतदान) असेल. 
 
एक किंवा दोनच मते द्यायची असतील तर पर्याय काय? 
-
मतदान यंत्रात चारही मते देण्यासाठी ठेवलेल्या मशिनमधील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे एक किंवा दोन मते द्यायची असल्यास मतदारांना उर्वरित दोन किंवा एका जागेसाठी नोटा हे बटन दाबावे लागले. तेव्हाच प्रक्रिया पूर्ण होईल. 
 
नोटा बटनही दाबायचे नसल्यास काय करता येईल? 
-
नोटा हे बटन एका उमेदवाराच्या जागेसारखेच असेल. कुठल्याही उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास नोटा बटन दाबून प्रक्रिया पूर्ण करता येईल. परंतु, मतदाराला एकच मत द्यायचे असेल अाणि नोटाही दाबायचे नसेल तर अशावेळी मतदान केंद्राध्यक्ष प्रथम मतदान केलेल्या बॅलेट युनिटवर पुठ्ठा टाकून ते झाकेल. त्यानंतर जेथे संबंधित मतदाराला मतदान करायचे नाही, त्या यंत्रावरील नोटा बटन हे मतदान प्रतिनिधींच्या समक्ष दाबून प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 
 
या संपूर्ण प्रक्रियेत मत बाद होण्याची शक्यता किती आहे? 
-
या प्रक्रियेत कुठेही मत बाद होण्याची शक्यता नाही. कारण, जेथे मत द्यायचे नाही तेथे नोटाचा पर्याय उपलब्ध असून, त्यानंतरच ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. मत बाद होण्याची शक्यता ही कागदी मतपत्रिकेच्या मतदान प्रक्रियेत होते. जेथे शिक्का मारुन मतदान केले जाते, शिक्का मारताना तो दोन उमेदवारांच्या मध्ये किंवा काही संशयास्पद खून केली असेल अशाच वेळी होते. परंतु इव्हीएममुळे हा मुद्दा नाहीसाच झाला आहे. 
 
मतदान झाले असे दर्शवणारा बिप आवाज केव्हा होईल? 
-
जेव्हा प्रभागातील सदस्य संख्येनुसार तीन अथवा चार जागांसाठी मतदान असेल तर संपूर्ण चार किंवा तीन बटने दाबल्यानंतरच बिप वाजेल. 
 
प्रत्येक जागेसाठी मतदान झाले हे कसे कळेल? 
-
प्रत्येक यंत्रावर वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील. प्रत्येक उमेदवाराचे चिन्ह आणि मतदानाचे बटन यात एलईडी लाइट लागेल. ती लाल रंगाची असेल आणि शेवटच्या जागेचे (जेथे तीन जागा तेथे जागेवर) मतदान झाल्यानंतर लगेचच शेवटच्या जागेचे बटन दाबले की लाल रंग लागण्यासोबतच मोठा बिप आवाज येईल. अर्थात मतदान झाले असे सिद्ध होईल. पुन्हा मतदान अधिकाऱ्यांकडून नवीन मतदारासाठी ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येईल. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, मतदानासाठी ही ओळखपत्रे आवश्यक... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...