आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्‍मानाबाद: जिल्ह्यातील वाया गेलेल्या पिकांचे होणार पंचनामे, चार समित्यांची स्थापना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- पिकांची वाताहात होत असल्याने अखेर प्रशासनाला पाझर फुटला. वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक दोन तालुक्यांसाठी एक प्रमाणे चार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. 
 
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. उडीद, मूग अन्य पिकांचा केव्हाच धुराळा झाला आहे. काही भागात सोयाबीन हिरवे दिसत असले तरी कळ्यांची गळती झाल्यामुळे आता पाऊस पडला तरी उत्पादनाची सुतराम शाश्वती नाही. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने दि. ऑगस्टला ‘पाऊस गायब, पिके कोमेजली, अग्रीम पीकविम्यावर भिस्त’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. परिणामी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी बैठक बोलावून पिकांचा मंडळनिहाय आढावा घेतला. जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये ३० पेक्षा अधिक दिवसांचा पावसाचा खंड दिसून आला आहे. हलक्या जमिनीतील पिकांचे केव्हाच नुकसान झाले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेच्या शासन निर्णयामधील सूचनेनुसार प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यासाठी विमा कंपनीचे अधिकारी शासनाचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या संयुक्त समितीमार्फत अधिसुचित विमा घटक स्तरावरील बाधित क्षेत्राची संयुक्तरीत्या पाहणी करुन नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येणार आहे. यासाठी समितीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी (महसूल) कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी यांच्या चार समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक समिती दोन तालुक्यातील मंडळनिहाय सर्व पिकांची संयुक्तरित्या पाहणी करेल. 
 
शेतकऱ्यांनी ज्या बँकेत पीकविम्याचा हप्ता भरला आहे. त्या बँकेत नुकसान झालेल्या पिकांचा तपशिलवार वैयक्तिक अर्ज करावा लागणार आहे. बँकांनाही अर्ज स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गमे कृषी अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी शिरिष जमदाडे यांनी केले आहे. 
 
बँकांना सूचना : सर्व बँकेच्या शाखांमध्ये टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांना संपर्क करण्यासाठी फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. कंपनीच्या टोल फ्री १८००१०३००६१ क्रमांकावर संपर्क करता येईल. 
 
बातम्या आणखी आहेत...