आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांना पाणी देतात त्या टाक्या मागील महिन्यांत धुतल्याच नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरवासीयांना दर आठ दिवसाला घरातील पाण्याच्या टाक्या धुण्यास सांगणाऱ्या महापालिकेत नगरसेवकांना पिण्याचे पाणी देतात त्या टाक्या मागील आठ महिन्यांपासून धुतल्याच नसल्याची धक्कादायक माहिती शनिवारच्या सभेत पुढे आली. याशिवाय शहरातील मनपा रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. शहरात डेंग्यू आजाराने डोके वर काढले असताना आरोग्य विभाग काहीच हालचाल करताना दिसत नाही. यामुळे नगरसेवक आक्रमक झाले आणि महापौर शोभा बनशेट्टी यांनी मनपा आरोग्याधिकारी डाॅ. जयंती आडकी यांना जबाबदार ठरवत त्यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले. 

शहरात मागील महिन्यात डेंग्यूच्या आजाराने दोन बालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सुकन्या इंगळे हिचा मेंदूच्या तापाने तर विकास धनेवाले या बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे आरोग्याधिकारी डाॅ. अाडकी यांनी सभागृहात सांगितले. शहरात डेंग्यूचा आजार फैलावत असताना आरोग्य विभागाने काहीच काम केले नाही. रामवाडीसह शहरातील रुग्णालयांची अवस्था दयनीय अाहे. मनपा दवाखान्यात औषधसाठा नाही. डाॅक्टर नाहीत. असले तरी ते वेळेवर येत नाहीत. या सर्व प्रकारास आरोग्य अधिकारी डाॅ. आडकी याच जबाबदार आहेत. त्यांना निलंबित करा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. नगरसेविका आक्रमक झाल्या. त्यानंतर डाॅ. आडकी यांना पदावरून हटवून दुसऱ्यांकडे पदभार द्यावा, असा आदेश महापौर बनशेट्टी यांनी महापालिका आयुक्तांना दिला. 

डेंग्यूने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे राजकुमार हंचाटे आणि विठ्ठल कोटा यांनी सभागृहापुढे आणला. त्यावर चर्चा सुरू असताना आरोग्य विभागाच्या बाबतीत नगरसेवक आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी रामवाडी प्रसूतिगृहाचा मुद्दा उपस्थित केला. वीज जोडणी नसल्याने शस्त्रक्रिया बंद आहेत. आम्ही डेंग्यूच्या बाबतीत आंदोलन केले. पण त्यानंतर आरोग्य विभागाने बैठका घेतल्या नाहीत. आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करा, असे ते म्हणाले. 

मनपा दवाखान्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या साहित्याची माहिती आरोग्याधिकारी डाॅ. आडकी यांना नाही. याबाबत दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत नगरसेवक किसन जाधव यांनी आरोग्य विभागास लक्ष्य केले. 

महापालिकेत नगरसेवकांना पिण्यासाठी पाणी दिले जाते, त्या टाक्या किती दिवसांपासून धुतल्या नाही? असा प्रश्न नगरसेविका सुनीता रोटे यांनी उपस्थित केला. आठ महिन्यांपासून नाही, असे उत्तर नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी दिले. पाण्यात अळ्या झाल्याचे निदर्शनास आणून दिले. 

स्थायी सभापती संजय कोळी यांनी स्वखर्चाने टाक्या धुण्याची तयारी दर्शवली. पण त्यास नगरसचिव कार्यालयाकडून प्रतिसाद नसल्याचे कोळी यांनी सांगितले. आरोग्याधिकारी काम करत नाहीत. स्वहिताच्या फायली पुढे नेतात तर जनहिताच्या फायली लालफितीत अडकून ठेवतात. औषधे नाहीत, असा आरोप करत डाॅ. आकडी यांना निलंबित करण्याची मागणी चंदनशिवे यांनी केली.

सभागृहात मंजूर झालेले विषय 
- दोन टक्के दंड माफीचा निर्णय अायुक्तांकडे. 
- हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या वारसदारांना घरकुल आणि मानधन देणे. 
- नगरसेवकांना ७२०० ऐवजी १० हजार मानधन 
- किडवाई चौक सुशोभीकरण करणे 
- पासपाेर्ट कार्यालयासमोरील चौकाचे संत बुरूड चौक नामकरण 
- नामविधान समितीत पदाधिकारी गटनेत्यांसह १३ जणांचा समावेश 
- शेळगीत कामेश्वर भक्त मंडळास मदत द्यावी 
- शेळगी ब्रीजला नाव देणे. 

घरातून येताना मनपा दवाखाने, शाळांना भेट द्या 
महापालिका दवाखान्यांची अवस्था दयनीय आहे. रामवाडीसह १२ दवाखाने सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. घरातून येताना मनपा दवाखाना आणि मनपा शाळेस भेटी द्या, त्यामुळे सुधारणा होईल. महापालिकेत शक्य असेल तेथे जलशुद्धीकरण संच बसवू. शहरात आरोग्याचा प्रश्न आहे, त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. कचरा पेटीतच टाका. दवाखान्यात दरमहा एक बैठक घेऊ. मनपा दवाखाने हे प्राथमिक उपचार केंद्र आहे. सर्व दवाखान्यांत सोमवारपासून औषधे मिळतील. काही कर्मचारी काम करत नाहीत. त्यांना प्रथम सुधारण्याची संधी देऊ आणि योग्य वेळी वाईट निर्णय घेतले जातील. त्यावेळी आपण सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी केले. 

चिमणी वाचवण्यासाठी बोरामणीचा विषय सभेत 
सोलापूर-होटगी रोडवरील विमानतळास अाडकाठी ठरलेल्या िचमणी पाडकामाचा विषय पालिका प्रशासनाच्या अजेंड्यावर गाजत असतानाच महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बोरामणी येथील विमानतळ तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासंदर्भात अालेल्या प्रस्तावास एकमताने मान्यता देण्यात अाली. ३० हजार घरकुलांसाठीच्या लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यास काही अटींवर मान्यता देण्याचा ठरावही एकमताने सभागृहाने संमत केला.
 
महापालिकेची आॅगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा शनिवारी सुमारे दोन तास उशीराने सुरू झाली. महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ही चिमणी वाचवण्यासाठी दिसली एकजूट 
सभा झाली. शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव अापटे यांचे नुकतेच निधन झाल्याने श्रद्धांजली वाहण्यात अाली. बोरामणी येथील विमानतळ तत्काळ सुरू करण्यासाठी तातडीचा प्रस्ताव आणला गेला, त्यास एकमताने मान्यता देण्यात आली. बोरामणी येथील विमानतळ तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ मुंबईस जाण्याचे ठरले. त्यात महापौर बनशेट्टी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, खासदार विजयसिंह मोहिते यांच्यासह आमदार, माजी खासदार, माजी आमदार, महापालिका पदाधिकारी, गटनेत्यांचा समावेश असावा असे सूचवले गेले. 

चर्चेवेळी अॅड. बेरिया म्हणाले, बोरामणी विमानतळ विकासासाठी २५० कोटींचा खर्च असून १०० कोटी रुपये खर्च केले अाहेत. उर्वरित १५० कोटींत केंद्र सरकार ५१ तर राज्य सरकारचा ४९ टक्के वाटा अाहे. त्यानुसार त्यांनी हिस्सा द्यावा, विमानतळ सुरू करावे. होटगी रोडवरील विमानतळाची जागा वाणिज्य संकुलसाठी वापरावी. नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले, कायद्याच्या कचाट्यात कोणी सापडू नये यासाठी हा खटाटोप आहे. लोकभावना समजून घेऊन बोरामणीचे विमानतळ तातडीने पूर्ण करावे. नगरसेवक नागेश वल्याळ यांनी नवीन विमानतळ करा, असे सांगितले. 

म्हाडाकडून सर्वेक्षणाची अाली होती सूचना 
३०हजार घरकुलांच्या लाभार्थी सर्वेक्षण करून पात्र लाभार्थी यादीस मान्यता द्यायची असल्याने हा विषय सभेसमोर होता. सभागृहाने सर्वेक्षणास मान्यता दिली, पण घरकुलस्थळी मनपा सोयी सुविधा देणार नाही. लाभार्थींची शहरातील झोपडपट्टी मनपाकडे वर्ग करावी अशी अट घातली. नगरसेवक चंदनशिवे यांनी अशी अट घालण्यास विरोध दर्शवला. िशवसेनेचे महेश कोठे यांनी लोकल सेल्फ गर्व्हंमेंट एजन्सीऐवजी म्हाडाकडून सर्वेक्षण करण्याची उपसूचना मांडली. नगरसेविका कामिनी आडम यांनी या सर्वेक्षण प्रस्तावास सभागृहाने एकमताने मान्यता दिल्याने आभार मानले. 

सभेपूर्वी विमानतळाच्या विषयावर महापौरांच्या निवासस्थानी दीड तास मंथन झाले. चिमणी बचावासाठी बोरामणी विमानतळाचा विषय एकमताने पुढे आला होता. 
बातम्या आणखी आहेत...