आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : GSTने थंडावली यंत्रमागांची धडधड; 50 टक्के उत्पादन ठप्प, व्यापाऱ्यांची भूमिका दोलायमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंत्रमाग कारखान्यांत अशी शांतता आहे. - Divya Marathi
यंत्रमाग कारखान्यांत अशी शांतता आहे.
सोलापूर - वस्तूसेवा कर अर्थात ‘जीएसटी’ने यंत्रमागांवरील उत्पादनांना बाजारपेठेत ब्रेक दिल्याने ५० टक्के उत्पादन घटले. बहुतांश होलसेल आणि रिटेल व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी केली नाही. त्यांच्याकडील मागील शिल्लक संपलेली नाही. त्यामुळे सोलापूरच्या उत्पादकांकडे मालाची मागणी नोंदवली नाही. परिणामी यंत्रमागधारकांकडे पक्कामाल पडून आहे. 
 
जुलैपासून जीएसटी लागू झाली. तत्पूर्वीपासूनच बाजारपेठेत एक प्रकारची मंदी आली. ज्याला अर्थतज्ज्ञ तात्पुरती मंदी म्हणत आहेत. जून महिन्यात व्यापारी शिल्लक माल संपवण्याच्या गडबडीत होते. त्यानंतर जीएसटीच्या विरोधात काही व्यापारी रस्त्यावर उतरले होते. गुजरातच्या सुरत शहरात त्याने जोर धरला. या गडबडीत सुरतमधील बाजारपेठ थंडावली. अशीच स्थिती उत्तर भारतातही होती. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशातही व्यापारी काही अंशी जीएसटीच्या विरोधात होते. परंतु त्याची तीव्रता दिसून आली नाही. उत्तरेकडे प्रामुख्याने सोलापुरी चादर आणि टेरिटॉवेलला मागणी असते. पाऊस सुरू झाला, की हिवाळ्यातील नोंदणी होत असतात. परंतु जीएसटीमुळे वातावरणच बदलून गेले. त्यामुळे कारखानदार भांबावून गेले. 
 
व्यापाऱ्यांची भूमिका दोलायमान 
यंत्रमागावरील उत्पादने आतापर्यंत व्हॅटमुक्त होती. केंद्रीय अबकारी करातही सवलत होती. आता जीएसटीच्या जाळ्यात व्यवसाय आला आहे. टक्के कर लागला. कारखानदार त्याच्या विरोधात गेले नाहीत. व्यापाऱ्यांची भूमिका मात्र दोलायमान स्थितीत आहे. शिल्लक माल संपत आला तरी मागणी नाही. त्यामुळे उत्पादन निम्म्यावर आले आहे.
'' पेंटप्पागड्डम, अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ 
 
केवळ कामगारांसाठी कारखाना चालवतो 
खरेपाहता, उत्पादन पूर्णपणे बंद ठेवण्याची स्थिती आलेली आहे. परंतु कामगारांची रोजी-रोटी बुडेल म्हणून कामाचे तास कमी करून उत्पादने घेतो आहोत. परिस्थितीत बदल झाला नाही, तर उत्पादन बंद ठेवल्याशिवाय पर्यायच नाही. व्यापाऱ्यांची भूमिकाही अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे सर्वत्र संभ्रमावस्था आहे.
'' मल्लिकार्जुन कमटम, कारखानदार 
 
जीएसटी तज्ज्ञ म्हणतात, सहा महिने मंदी राहील! 
जीएसटी लागू झाल्यानंतर उद्योग-व्यापार पूर्णत: त्याच्या प्रवाहात आलेला नाही. त्याला थोडासा कालावधी लागेल. त्यामुळे किमान सहा महिने मंदी राहण्याची शक्यता आहे. आषाढ महिन्यात खरेदी नसते. सण, उत्सव किंवा मुहूर्त नसतात. त्यामुळे व्यापार थंडावलेलाच असतो. त्याला कारण जीएसटीशी जोडले तरी त्यातून कुणाची सुटका नाही.
'' सुनील अग्रवाल, सनदी लेखापाल 
 
निर्यातीवर परिणाम, उलाढाल निम्मीच 
टॉवेल आणि नॅपकीनच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झालेला आहे. निर्यातीला जीएसटी परतावा असला तरी बहुतांश निर्यात मुंबईतल्या व्यापाऱ्यामार्फत होतो. त्यामुळेही निर्यात खंडित झाली. देशांतर्गत बाजारपेठेत दररोज साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल आहे. ती निम्म्यावर आल्याचे कारखानदार म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...