आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता यावी, मुख्यमंत्र्यांचे साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- आमच्या सरकारने आखलेल्या धोरणाच्या  माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता यावी, अशी प्रार्थना कुलदैवत श्री नृसिंह-लक्ष्मी यांच्याकडे केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नृसिंहपूर (ता. इंदापूर,  जि.पुणे) येथील श्री नृसिंह-लक्ष्मी मंदिर परिसराचा येत्या तीन वर्षांत २६० कोटी रुपये खर्चून विकास करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे बुधवारी (दि. ४) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, या वेळी ते  पत्रकारांशी बोलत होते.
 
भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, ‘२६० कोटी रुपये खर्चून नृसिंहपूर देवस्थानचे रूपडेच बदलणार आहे. पुढील तीन वर्षांत ही कामे पूर्णत्वास जातील. येथील प्राचिन परिसर निर्मितीवेळी होता तसा पुन्हा नव्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येथील लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन देखभाल दुरुस्तीविषयी योजना तयार करण्यात येईल. तयार केलेला आराखडा हुबेहूब राबवण्यात यावा,’  असे मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला  सुचवले.

या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, मंदिर समितीचे अध्यक्ष प्रमोद दंडवते, विश्वस्त पुरषोत्तम वांकर, अभय वांकर, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे  आदी उपस्थित होते. 

२६० काेटींचा अाराखडा, वर्षभरात पहिला टप्पा
नृसिंहपूर येथील देवस्थानासाठी २६० कोटींचा विकास आराखडा तयार करून त्याला मंजूरी दिली   आहे. त्यातील २२ कोटी ३९ लाखांच्या कामांचे भूमिपूजन बुधवारी ( दि.५) झाले. यामध्ये माणकेश्वर वाडा, भक्त व पर्यटक निवास आणि सार्वजनिक सोयी सुविधांच्या विकासकामांचा समावेश आहे. पहिला टप्पा एका वर्षात पूर्ण होईल. लवकरच पहिल्या टप्प्यात साडेचार कोटी खर्चून मुख्य मंदिरातील शिखर, सभामंडप, फरशी या कामांद्वारे  विकास केला जाणार आहे.

कामांना आशीर्वाद हवा
‘श्री नृसिंह-लक्ष्मी हे माझे कुलदैवत आहे. यांच्या आशीर्वादानेच मी वेगवेगळ्या कामांना सुरुवात करतो. त्यांची माझ्यावर कृपा आहे. चांगली कामे करायला ईश्वरी आशीर्वाद हा लागतोच. राजकीय लोकांसाठी जनताही ईश्वरासमानच असते. त्यांचीही कृपा महत्त्वाची असते,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...