आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घरवापसी' निरर्थक, मी तर कडी लावली आहे : नारायण राणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ज्यांना जेथे जावे वाटेल तेथे त्यांनी जावे, त्या नेत्यांमध्ये माझा समावेश नाही. मी तर कडी लावली आहे. घर वापसीची चर्चा माझ्याबाबत निरर्थक आहे. माझा वापसीचा काहीही संबंध नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालाने भाजपची लाट संपल्याचे दिसून अाल्याचे राणे म्हणाले.

ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यात नारायण राणे त्यांच्या पत्नी नीलम राणे उपस्थित होत्या. त्यानंतर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवसेनेतून निघून गेलेल्या नेत्यांना परत शिवसेनेत अाणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली अाहे. शिवसेना सोडून गेलेल्या नेतेमंडळींना पुन्हा पक्षात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. छगन भुजबळ तुमचे नाव आहे, अशी टिपण्णी पत्रकारांनी केली. त्यावर राणे म्हणाले, कोणी ‘कोठे’ जावं याच्याशी माझा काही संबंध नाही. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभारावर सडकून टीका केली.

भाजपची लाट अोसरली
राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला. लाट कधीच पूर्णवेळ चालत नसते. ती येते अन् संपते. मोदींची हवा आणि लाट संपली आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही फेल गेले आहेत. दोघांनी दिलेले शब्द वचनांची पूर्तता झाली नाही. राज्य सरकार तर बट्ट्याबोळ करत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ काय कारभार करतं हेच लोकांना कळत नाही. शेतकऱ्यांना ते दिलासा देऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांसाठी तिजाेरी रिकामी करू म्हणणाऱ्या राज्य शासनाने काँग्रेसने केली तेवढी आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली नाही. दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त हवालदिल असून त्यातून सावरण्याची जबाबदारी सरकारची अाहे. पण, ती जबाबदारी सांभाळण्यात असमर्थ ठरले आहेत. प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांचे एेकत नाहीत, ही शोकांतिका आहे.

शिस्तबद्ध यात्रा पाहून भारावलो : राणे
सिद्धेश्वरयात्रेला प्रथमच मी आलो. एक भव्य यात्रा मी पाहिली अन् अनुभवले. गेल्या ९०० वर्षांपासून ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होणारी राज्यातील चांगली यात्रा सोलापुरात पार पडते, असे त्यांनी सांगितले.

काडादी यांच्या घरी माजी आमदार शिवशरण पाटील, उत्तमप्रकाश खंदारे यांनी राणे यांची भेट घेतली. शिवसेनेतील आठवणी अन् किस्से सांगत त्यांची गप्पांची मैफल भरली होती. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे उपस्थित होत्या. काडादी कुटुंबीयांतर्फे देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

कमळ चिन्हाच्या गाडीतून राणेंचा प्रवास
माजी मुख्यमंत्री राणे हे पत्नीसह अक्षता सोहळ्यासाठी आले होते. सम्मती कट्याजवळील व्हीआयपी कक्षात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे, खासदार अॅड. शरद बनसोडे, वर्षा बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमवेत अक्षता सोहळा राणे यांनी पाहिला आणि आनंद व्यक्त केला. तेथून परत येताना सिद्धेश्वर मंदिर ते डाॅ. आंबेडकर चौकपर्यंत ते पायी आले. चौकात गाडी नसल्याने बराच वेळ त्यांनी गाडीची वाट पाहिली. धर्मराज काडादी, शिवशरण पाटील, प्रवीण बाबर यांनी गाडीचा शोध घेतला. काडादी यांनी आपली गाडी मागवली. बराच वेळ राणे चौकात थांबल्याने त्यांना पाहण्यास गर्दी वाढली. दरम्यान, राणेंची गाडी अाल्याने माजी आमदार शिवशरण पाटील यांच्या शिवरथ या गाडीतून काडादी यांच्या घरी जेवायला जावे लागले. विशेष म्हणजे या गाडीच्या पाठीमागील काचेवर ‘कमळ’ चिन्ह होते.