आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Invitation To Deepak Sawant For The PHC Opening

पालकमंत्र्यांचे उद्घाटन पत्रिकेत नाव टाळले, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्याकडून निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे आरोग्यमंत्री असूनही त्यांना ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने या प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त केल्याने युतीमधील खदखद बाहेर आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कार्यक्रम पत्रिकेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा उल्लेख न केल्याने आश्चर्य व्यक्त होत अाहे.
ढोकीचे आरोग्य केंद्र उद्घाटनापूर्वीपासून वादात सापडले होते. राष्ट्रवादीने उद्घाटनासाठी धरलेला अट्टाहास लक्षात घेऊन भाजपने जिल्हा दौऱ्यावर अन्य कार्यक्रमासाठी आलेले विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले. मात्र, या कार्यक्रमाची आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना कल्पनाही देण्यात आली नव्हती, त्यामुळे शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी यासंदर्भात प्रसिध्दीपत्रक जारी केले असून, त्यात भाजपसह जिल्हा परिषदेचा निषेध करण्यात आला आहे. पाटील यांनी म्हटले आहे की, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना कार्यक्रमातून डावलण्यात आल्यामुळे शिवसैनिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आणि जिल्हा परिषदेने आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या मंत्र्यांना आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वास्तूच्या उद्घाटनापासून वंचित ठेवणे, हे गंभीर आहे.

युतीठेवायची का? विचार करू : विधानसभेचेअध्यक्ष हरिभाऊ बागडे यंाच्या हस्ते ढोकी आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन उरकण्यात आले. वस्तुत: राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यांना डावलून इमारतीचे उद्घाटन केल्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली असून, भाजपने तसेच जिल्हा परिषदेने मंत्रीपदाचा विचार करण्याची गरज होती. या इमारतीच्या निधीसाठी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी प्रयत्न केले होते, असे असताना त्यांना डावलण्याचे कारण काय होते, हे जिल्हा परिषदेने आणि भाजपने स्पष्ट करावे, अन्यथा जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती ठेवायची की नाही, याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

अध्यक्षांनी धोका दिला
शिवसेनेनेपत्रकात म्हटले आहे की, ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांना भेटलो होतो. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन करू, अशी विनंती केली होती. मात्र, अॅड. धीरज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इमारतीच्या उद्घाटनासाठी येणार आहेत, त्यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करू, असे सांगितले होते.