आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 हजार शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटच नाही; विद्यार्थ्यांना धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शेजारच्या नगर जिल्ह्यात शाळेचे छत कोसळल्याने चार विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. असे असूनही येथील जिल्हा परिषदेला अद्याप जाग आलेली नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिटच पूर्ण करण्यात आलेले नाही. यामुळे नेमकी कोणती इमारत धोकादायक आहे, याचा अंदाज येत नसल्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत उपाययोजना करण्यास अडचणी येत आहेत. 
 
शाळेचे छत कोसळून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नगर जिल्ह्यातील घटनेमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. राज्यात सर्व जिल्हा परिषदांनी शाळांच्या इमारतींच्या सुरक्षेबाबत अवलोकन सुरू केले आहे. तसेच धोकादायक इमारतींबाबतीत दक्षता घेण्यासही प्रारंभ केला आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींना कोणी वाली आहे की नाही, याची शंका येत आहे. कारण आता पावसाळा संपत आला तरीही शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलेले नाही. जूनमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यास सांगितले होते.
 
त्यानुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी बांधकाम विभागाला त्यावेळीच पत्र दिले होते. मात्र, दोन महिने होत अाले तरीही बांधकाम विभागाने याबाबत काहीच हालचाल केलेली नाही. जिल्ह्यातील सर्वच भागातून शाळांच्या छतांना गळती लागण्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०९६ शाळा आहेत. येथे तीन लाख १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नेमकी कोणती शाळा धोकादायक अाहे, याचा अंदाजच नसल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. यासंदर्भात विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 
 
पदाधिकारी निद्रिस्त : झेडपीतील सत्ताधारी पदाधिकारी विरोधकही या बाबतीत निद्रिस्त आहेत. सीईओंचे आदेश असतानाही कोणाकडूनही याबाबत ठोस पाठपुरावा झालेला नाही. 
 
स्ट्रक्चरल ऑडीट 
इमारत बांधण्यात आलेला कालावधी इमारतीची सध्याच्या स्थितीचा स्ट्रक्चर आॅडीटमध्ये विचार केला जातो. यासाठी स्लॅब भिंतीचा ठिसूळपणा तपासला जातो. भिंतीत पाझरत असलेल्या पाण्याचे प्रमाण पाहिले जाते. यांच्या एकत्रित परिणामाने इमारतीचे अंदाजे आयुर्मान, कालबाह्यता, स्थितीची टक्केवारी ठरवली जाते. 
 
स्ट्रक्चरल ऑडिटचा पाठपुरावा सुरू 
शिक्षणविभागला तांत्रिक ज्ञान नसल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटसाठी बांधकाम विभागाला जूनमध्ये पत्र दिले आहे. तसेच या बाबत पाठपुरावाही सुरू आहे. सीईओ आनंद रायते यांच्या आदेशावरून स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया करण्यात येत आहे. ऑडिट झाल्यानंतर निधीचे नियोजन करणे सोपे होणार आहे. 
- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी. 

..तर निधीची बचत 
एखाद्याशाळेतील फरशी बसवणे, खिडकी बसवण्यासारखी किरकोळ कामे असली तरी लाखांच्या घरात निधी मंजूर होतो. काही चांगले असलेले भागही विनाकारण पाडून नवीन तयार केले जातात. यामुळे निधीची अकारण उधळपट्टी होते. ऑडिटमुळे नेमकी कोणती कामे आवश्यक आहेत, हे समोर येईल. तेवढाच निधी मंजूर करून कामे करता येतील. यामुळे निधीची बचतही होणार आहे. 
 
इतिहासात नाही आॅडिट 
जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधीच स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आलेले नाही. आता सीईओ आनंद रायते यांच्या पुढाकारातून ऑडिट होत आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून याला खो बसत आहे. शिक्षण विभागाकडून यासंदर्भात गुरुवारी (दि. ३१) अाणखी एक पत्र देण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...