आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीअभावी नळजोडणी बंद; नागरिकांना पाणी ‘महाग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शहरातील विविध भागांत लहान जलवाहिनी बसविण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांना नळजोडणी घेण्यासाठी अडचणी येत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरूनही नागरिकांना उन्हाळ्याप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. यासाठी अटल अमृत योजनेतील कामे तातडीने करणे गरजेचे आहे. परंतु नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही कोणी दखल घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. नागरिकांना भरपूर पाणी मिळावे, यासाठी उजनी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी उपलब्ध करण्यात आले. उजनी धरण सध्या तुडुंब भरलेले आहे. तसेच तेरणा रुईभर प्रकल्पही भरलेला आहे. मात्र, धरणे तुडुंब भरलेली असूनही नागरिकांना अद्यापही मुबलक पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. पाणी आहे मात्र, पाणी वितरणाची यंत्रणाच अद्याप सुसज्ज नसल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शहरातील विविध भागामध्ये उजनी योजनेच्या मोठ्या नऊ इंच जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी वितरण करण्यात येत आहे. 
 
याच्या माध्यमातून प्रमुख जलकुंभात पाणी सोडले जात आहे. अशी जलवाहिनी शहरात सर्वत्र बसवण्यात आली आहे. मात्र, अद्यापही विविध भागात नळाची जोडणी देण्यासाठीची जलवाहिनी बसवण्यात आलेली नाही. तेरणा पब्लिक स्कूल रस्ता, यशवंत नगर, गवळीवाडा समाेरील भागासह अन्य काही ठिकाणी लहान जलवाहिनी बसवण्यात आलेली नाही. येथे तीन इंची जलवाहिनी बसवण्याची गरज आहे. तेव्हाच नागरिकांना नळांच्या जोडण्या घेता येणार आहेत. येथील नागरिक अशा जलवाहिनीची सातत्याने मागणी करत आहेत. मात्र, नगरपालिकेकडून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना पाणी असूनही पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

विकतचे पाणी : लहानतीन इंची जलवाहिनी नसलेल्या भागात विकतचे पाणी वापरावे लागत आहे. आठवड्याला पाचशे लिटर पाण्याचा टँकर अद्यापही यांच्या घरासमोरून हटलेला नाही. मोठा पाऊस होऊनही उन्हाळ्यासारखी परिस्थिती नागरिकांना अनुभवावी लागत आहे. पिण्यासाठी तर बाराही महिने जार विकत घेणे क्रमप्राप्त ठरल्याचे दिसते. 

नागरिक त्रस्त 
विविधभागात लहान जलवाहिनी बसविण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांना नळांची जोडणी घेता येणे अशक्य झाले आहे. यामुळे अद्यापही नागरिकांना विकत पाणी घेऊन प्यावे लागत आहे. तातडीने उपाययोजना करावी. -व्ही.एम. चाकवते, नागरिक. 

मान्यता घेणार 
अटल अमृत योजनेतून जलवाहिनीची कामे प्रस्तावित आहेत. या योजनेतून तातडीने कामे करण्यात येणार आहेत. लवकरच सर्वसाधारण सभा घेऊन या योजनेसंदर्भातील ठरावांना मान्यता घेण्यात येणार आहे - मकरंदराजेनिंबाळकर, नगराध्यक्ष. 

दूरवरून जोडणी 
टीपीएस रस्त्यासह विविध भागातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवरून जोडणी घ्यावी लागत आहे. दूरचे अंतर तसेच अधिक वळणे घेऊन जाेडणी घ्यावी लागत असल्यामुळे येथील नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. असे असूनही दूर अंतरामुळे मुबलक दाब नसल्याने कमीच पाणी मिळत आहे. अन्य भागात जादा पाणी नळाला येते. येथे मात्र, केवळ पाच ते दहा घागरी पाणी येत असल्याचे चित्र आहे. 

उजनी योजनेच्या हातलाई मंदिराजवळीत फिडरला सुरळीत योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. तीन वर्षांपूर्वी पालिकेने यासाठी ४८ लाख रुपये डिमांड भरले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे अडचणी आल्या. आता जाधववाडी ३३ के. व्ही. उपकेंद्रापासून वेगळी लाइन टाकण्यात येऊ शकते. यासाठी नवीन निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन लाइन टाकण्याचे काम झाल्यावरच योग्य दाबाने वीजपुरवठा होऊन उजनीचे अपेक्षित पाणी मिळू शकेल. मात्र, यासाठी अाणखी पाच महिने लागण्याची शक्यता आहे. 

विजेसाठी आणखी पाच महिने 
अमृत योजना राबवण्याबाबत गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून चांगलाच गाजावाजा झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने या योजनेतून पाणी पुरवठ्यासंदर्भातील कामे करण्याबाबत निवडणुकीत आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही योजनेसाठी विशेष हालचाली सुरू नाहीत. शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने या योजनेची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.