आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनटीपीसी’ जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत उजनीतून पाणी सोडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पिवळसर पाणी अाणि ‘एनटीपीसी’ जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत उजनीतून पाणी सोडण्यासाठी येत्या अाठवड्यात बैठक घेण्याचे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती अामदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या आैज बंधाऱ्यातील पाणीसाठा जानेवारीअखेर संपुष्टात येत अाहे. पुढील काळात पाणीपुरवठा करण्यासाठी उजनीतून २० जानेवारीपर्यंत पाणी साेडावे, अशी मागणी अामदार प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी केली होती. त्यांच्या एका शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी एनटीपीसीची पाइपलाइन तयार होईपर्यंत उजनी धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रातून अौज बंधाऱ्यासाठी सोडण्याचा निर्णय घेऊ, पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शहरात पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याने त्याबाबत तातडीने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. याबाबत बैठक घेण्याचे अाश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

पिवळसर पाणीपुरवठ्याबाबत भीतीचे वातावरण असल्याने आमदार शिंदे, महापौर सुशीला आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक चेतन नरोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. याबाबत संबंधित विभागाची बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना मागितली माहिती : पिवळ्या पाण्याबाबत याचिका दाखल करण्यासाठी आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र व्यवहार करून माहिती मागितली आहे.

पर्यावरण सचिवांना पत्र
आमदारशिंदे यांनी पर्यावरण सचिव मालिनी शंकर यांना पत्र देऊन माहिती दिली. याशिवाय काही मुद्दे उपस्थित केले. त्यात नदीपात्रात कोणते रसायन मिसळले, माशांचा मृत्यू कशामुळे, पाण्याला पिवळा रंग कशामुळे आला, शुध्द केलेल्या पाण्यास वास कशामुळे येतो, दूषित पाण्यासाठी आतापर्यंत कोणती उपाययोजना केली, पिवळसर पाण्यामुळे मानवी जीवास धोका आहे का? आदीचा समावेश आहे.

प्रदूषण मंडळावर फौजदारी करा : चंदनशिवे
शहरात पिवळसर पाणीपुरवठ्यास कारणीभूत असलेल्या प्रदूषण मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करा, असे निवेदन आणि फिर्याद बसपा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिली. शहरात पिवळसर पाणीपुरवठा हाेत असताना प्रदूषण मंडळाने काहीच कारवाई केली नाही. मळीमिश्रीत पाणीपुरवठा होत असताना कोणत्याही कारखान्यास नोटीस दिली नाही. त्यामुळे या सर्व बाबीस प्रदूषण मंडळाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर फौजदारी करा, असे निवेदन चंदनशिवे यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...