आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात तास लेखणीबंद आंदोलन, कर्मचाऱ्यास प्राध्यापकाने केली मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठात गुरुवारी दुपारी एका प्राध्यापकाने बिल फाइलच्या कारणावरून क्रीडा विभागातील कनिष्ठ लिपिकास शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेच्या निषेधार्थ विद्यापीठ कर्मचारी संघटना, विद्यापीठ चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ आदी संघटनांनी विद्यापीठात लेखणीबंद आंदोलन केले. सायंकाळी पाच वाजता संबंधित प्राध्यापकाने जाहीर माफी मागितल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

डीएव्ही वेलणकर वाणिज्य महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक एस. डी. मुनकर आणि स्वर्णलता गांधी महाविद्यालयाचे प्रा. मकरंज भुजबळ विद्यापीठातील क्रीडा विभागात आले. क्रीडा स्पर्धेनंतरची एक बिल फाइल मंजुरीसाठी विभागात दाखल होती. त्याची विचारणा त्यांनी तेथील कनिष्ठ लिपिक विजयकुमार धाकडे यांच्याकडे केली. त्यावर दहा मिनिटे थांबा, पाहतो असे धाकडे यांनी सांगितले. नंतर काही वेळाने पुन्हा प्रा. मुनकर यांनी विचारणा केली. त्यावर धाकडे यांनी १४० रुपये नाही तर ९० रुपये खर्च बिल मंजूर होते असा नियम दाखवला. यामुळे प्रा. मुनकर यांचा पारा चढला. गच्ची धरली. लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना सामाजिक शास्त्र संकुलातील क्रीडा विभागात दुपारी घडली. बेशुद्ध पडलेल्या धाकडे यांना विद्यापीठाच्या आरोग्य विभागात दाखल केले.

संबंधित प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन विद्यापीठ कर्मचारी संघटनेने अध्यक्ष पी.टी. रणदिवे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वसंत सपताळे, कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिंदे, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी दिले आहे.

प्राचार्याही धावून आल्या विद्यापीठात
प्राध्यापकानेकेलेल्या मारहाणीचे वृत्त समजताच सर्व कर्मचारी घटनास्थळी आले. माहिती घेतल्यानंतर लेखणी बंद आंदोलन करत विद्यापीठ गेटवर एकत्रित आले. प्राध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली. कुलसचिव एस. के. माळी यांच्याकडे निवेदन देत तक्रार केली. सायंकाळी पाच वाजता वेलणकर महाविद्यालयाच्या प्राचार्या कीर्ती पांडे विद्यापीठात आल्या. त्यांनीही माहिती घेतली. दरम्यान प्रा. मनुकर यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलेल्या कर्मचाऱ्यांसमोर येत घडल्या प्रकरणात चूक झाल्याचे सांगून कर्मचाऱ्यांची माफी मागितली. यानंतर लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आले.

महाविद्यालयाकडे कारवाईचे पत्र देणार
विद्यापीठ प्रांगणात झालेल्या या हाणामारीची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. संबंधित महाविद्यालयाने या प्राध्यापकावर कारवाई करावी, असे पत्र विद्यापीठ पाठवणार आहे. शिवशरण माळी, कुलसचिव