आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: जिल्ह्यात वाळूच मिळत नसल्याने बांधकामे झाली ठप्प, लोक त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा - हरित लवादाच्या आदेशानुसार नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास बंदी घातल्याने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील घरकुलांची, शौचालयांची कामे रखडली आहेत. माढा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये याहून वेगळी परिस्थिती नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बांधकामासाठी त्रस्त झाले आहेत. 
 
गेल्या दोन महिन्यांपासून वाळू मिळत नसल्याने कोट्यवधी रुपयांची बांधकामे थांबली आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले अाहेत. बांधकाम मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. वाळू लिलावच बंद असल्याने शासकीय विकासकामे खोळंबली आहेत. माढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश बेरोजगार तरुण हे बांधकाम मजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वाळू लिलावाला स्थगिती मिळाल्याने बांधकामासाठी वाळू मिळणे कठीण होऊन बसले आहे. जो तो आपल्या मित्र मंडळींना वाळू कुठून मिळेल का, अशी विचारणा करताना दिसत आहे. 
 
रमाई घरकुल योजना, प्रधान मंत्री आवास, इंदिरा आवास या योजनेमधून गरिबांना घरकुले मंजूर होऊन आली आहेत. मात्र वाळूच मिळणे अशक्य असल्याने ती अपुरीच राहिली आहेत. ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय उभारण्याची ही कामे ठप्प अवस्थेत आहेत. 
माढा शहरात नागरिकांच्या घराची आणि दुकानांच्या मोठ्या इमारतीची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे ही बांधकामे वाळूविना अर्धवटच राहिली गेली आहेत. बांधकाम साहित्य व्यावसायिकांचा व्यवसाय मंदावला आहे. घरकुल शौचालयाच्या अपुरे काम पूर्ण करण्यासाठी वाळू उपशाला परवानगी द्यावी अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केल्या. 
 
वाळूला सोन्याचा भाव 
वाळू सहजासहजी मिळणे कठीण बाब असल्याने वाळू व्यावसायिक तब्बल सहा ते सात हजार रुपये ब्रास अशा चढ्या दराने वाळूची विक्री करत आहेत. ज्या व्यावसायिकांना तातडीने कामे करावयाची आहेत ते हा ज्यादा दर देऊन वाळू घेत आहेत. वाळू मिळत नसल्याने बांधकामधारक व्यावसायिक नागरिक हे वाळूला पर्याय म्हणून ‘डस्ट’चा वापर करताना दिसू लागले आहेत. डस्टला प्रतिब्रास १८०० रुपयांपर्यंत दर आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...