आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफा बाजार सुरू; व्यवहार थंडच- तब्बल ४२ दिवस चालला सराफा व्यापाऱ्यांचा बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तब्बल४२ दिवसांपासून सुरू असलेला सराफा व्यापाऱ्यांचा बंद अखेर बुधवारी (दि.१३) मागे घेऊन बाजार खुला करण्यात आला. परंतु, सध्याची दुष्काळी परिस्थिती संप मिटल्याबाबत माहिती नसल्याने व्यवहार मात्र थंडच असल्याचे दिसून आले.

देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी अबकारी शुल्क माफ करावे, या मागणीसाठी बेमुदत दुकान बंद आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर धरणे आंदोलन, निवेदन, मोर्चा, केंद्रीय अर्थमंत्र्यांचे श्राद्ध अशा विविध प्रकारे आंदोलनाची धार वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तरीही शासन कोणतीच दखल घेत नसल्याने आंदोलनाचे दिवस वाढतच चालले होते. लग्नसराईमुळे थोडी अडचण वाढत असल्याचे लक्षात येताच काही सराफांनी लपून-छपून व्यवहार करण्यास प्रारंभ केला होता. या सर्व प्रकरणाचा दैनिक ‘दिव्य मराठी’ने भांडाफोडही केला. दरम्यान, सराफा असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा होऊन सराफांच्या ११ पैकी जवळपास मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर बुधवारी (दि.१३) ४२ दिवसांपासून सुरू असलेला सराफांचा बेमुदत बंद अखेर मागे घेण्यात आला. या बंदमध्ये उस्मानाबाद शहरातील दीडशेवर सराफांसह जिल्हाभरातील ७०० सराफांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. यामुळे जवळपास जिल्ह्यातील पन्नास कोटीहून अधिक सोन्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार ठप्प झाला होता. बुधवारी सराफांची दुकाने उघडली असली तरी ग्राहकांचा मात्र काहीच प्रतिसाद नसल्याने सराफा लाइनमध्ये ग्राहकांविना शांतताच दिसत होती. तसेच महत्त्वाचा गुढीपाडव्याचाही सण हातचा गेल्याने सराफांचे नुकसान झाले आहे.