आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताशी ९० किमी वेगाने धावणार गाडी, सोलापूर रेल्वे विभागात पहिल्यांदाच लोकल सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रविवारीअंतिम चाचणीसाठी सोलापूर रेल्वे स्थानकावरून लोकल धावली. चाचणीत कोणत्याही प्रकारचे दोष आढळले नाहीत. त्यामुळे सोलापूर ते मिरज दरम्यान लोकल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. येत्या २० एप्रिलपासून लोकल सेवेला प्रारंभ होणार हे आता निश्चित झाले आहे.

सोलापूर रेल्वे विभागात पहिल्यांदाच लोकल सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसोबत रेल्वे प्रशासनही उत्सुक आहे. मिरज ते सोलापूर दरम्यान थोडा तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सोलापूर रेल्वे प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवर हालचाल करून तो दोष दूर केला. रविवारी सकाळी १० वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून लोकलच्या अंतिम चाचणीस प्रारंभ झाला. पंढरपूरपर्यंत ही चाचणी घेण्यात आली.

सोलापूर - मिरज - सोलापूर लोकल ताशी ९० किमीच्या वेगाने धावणार आहे. लोकलला १२ डबे जोडण्यात आले आहेत. कोणत्याही कारणासाठी लोकलच्या सेवेत खंड पडू नये म्हणून लोकलच्या रेकला तीन इंजिन जोडण्यात आले. म्हणजेच प्रत्येकी चार डब्यांसाठी एक इंजिन असणार आहे. दोन्ही बाजूने इनबिल्ट इंजिन असून मध्येच एक इंजिन लोकलच्या रेकला जोडण्यात आलेला आहे. तसेच याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे लोकलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्थाही केली आहे. चाचणीवेळी यांत्रिकी विभागाचे नाशिककर, परिचालन निरीक्षक पी. गोपालन, मुख्य क्रु नियंत्रक शेख हुसेन, संजय कोळी आदी कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर स्थानकावर लोकल गाडीची चाचणी घेतानाचे छायाचित्र.

चाचणीत आली नाही कोणतीही अडचण
रविवारी सकाळी लोकलची अंतिम चाचणी घेण्यात आली. चाचणीत कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही. त्यामुळे लोकलसेवेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. २० एप्रिलपासून लोकल सेवा सुरू होणार आहे. पी. एस. पुन्नूस, विभागीयपरिचालन व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे विभाग.
२० पासून धावेल सोलापूर ते मिरज लोकल, अंतिम चाचणी यशस्वी