आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अत्रे अन् पुलंही विनोद लिहू शकले नसते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पूर्वीच्या तुलनेत आता साध्या साध्या कारणावरून लोकांच्या भावना दुखावतात. त्यामुळे वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरून राजकीय व्यंगचित्रे गायब झाली आहेत. खरा विनोद समजून घेण्याची लोकांची क्षमता कमी झाली आहे. आज प्र. के. अत्रे किंवा पु.ल. देशपांडे हयात असते तर विनोद लिहूच शकले नसते, अशी टिपण्णी चित्रकार विवेक मेहेत्रे यांनी व्यक्त केली.
उद्योग बँक व्याख्यानासाठी ते सोलापुरात आले होते. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली. देशाची लोकसंख्या १२३ कोटी आहे. पण संपूर्ण देशात व्यंगचित्रकारांची संख्या १२० पण नाही. पूर्वी व्यंगचित्रांना पेपरमध्ये चांगले स्थान मिळत असे. आता त्याची जागा फार आकुंचित झाली आहे. पूर्वी जहाल टीकाही लोक विनोद म्हणून समजून घेत असत. आता साध्या वाक्यातूनही लोक नसता अर्थ काढतात. त्यामुळे किरकोळ कारणावरूनही लेखक, विचारवंतांना कोर्ट कचेऱ्या करण्याची वेळ आलेली आहे. काही संघटना, पक्ष केवळ पब्लिसिटी म्हणून वाद पेटवतात. त्याला टीव्ही मीडिया टीआरपी मिळवण्यासाठी प्रसिद्धी देतो. त्यातून हिंसक आंदोलने आणि मोर्चे निघाले आहेत.
लोकांचा दबाव लक्षात घेऊन आता त्या त्या बाबींना सावध प्रसिद्धी मिळते. संवेदनशील काही लिहून अथवा बोलून चालत नाही. चौकशा, वाल्याचा वाल्मीकी, बिनपाण्याने करणे अशा वाक्यांनाही लोक हरकत घेतात. उपहास, विनोद याचे स्वतःच्या राजकीय आणि सामाजिक स्वार्थासाठी कसलेही अर्थ काढले जातात. होता जीवा म्हणून वाचला शिवा, या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाक्यालाही आक्षेप घेऊन त्यांच्यावर १३ वर्षे खटला चालू असल्याचेही मेहेत्रे म्हणाले.
अॅनिमेशनमध्ये खऱ्या चित्रकाराला वाव नाही
अनिमेशनक्षेत्र आता फार यांत्रिक बनले आहे, असे सांगताना मेहेत्रे पुढे म्हणाले की, याचे साॅफ्टवेअर तयार आहेत. यामुळे मूळ चित्रकला मारली जाते. जे जे आर्टमधून बाहेर पडलेल्या चित्रकाराला, देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंगचित्र काढता येईल का हे सांगता येत नाही. यात प्रत्येक चेहरेपट्टीचे अंगभूत वैशिष्ट्य काढता आले पाहिजे, तेथे संगणक काही करू शकत नाही, क्रिएटिव्हीटी मार खाता कामा नये... मुलांचे कार्टून पाहणे वाढण्यास पालक जबाबदार आहेत. कारण ते मुलांना वेळ देत नाहीत, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...