आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एनटीपीसी'ला प्रक्रिया केलेले देणार पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी एनटीपीसीला देणे आणि एनटीपीसी प्रकल्पासाठी उजनीहून टाकण्यात आलेली एक जलवाहिनी शहरासाठी घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी दिल्यास एक जलवाहिनी महापालिकेस देण्याची प्राथमिक तयारी एनटीपीसीने दर्शविली आहे. गुरुवारी महापालिका आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.
केंद्र सरकारकडून २८ जानेवारी रोजी अध्यादेश काढण्यात आला. त्यात ५० किमी शहर परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी घेण्याचे म्हटले आहे. गुरुवारच्या बैठकीत महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी पाणी घेण्याबाबत तीन पर्याय एनटीपीसी अधिकाऱ्यांसमोर ठेवले आहेत.

पर्याय असे : देगावयेथील ७५ एमएलडीच्या मलनिस्सारण केंद्रातून पाणी देणे, देगाव, प्रतापनगर, कुमठे येथील मलनिस्सारण केंद्रातील पाणी देगाव येथे एकत्र करणे, मलनिस्सारण केंद्रातील पाणी एनटीपीसी येथे नेऊन तेथे प्रक्रिया करणे.

देगावकेंद्रास भेट :केंद्राकडून निर्णय झाल्याने शहरातील सांडपाणी घेण्यासाठी एनटीपीसी तयार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले खर्च करण्याची तयारी एनटीपीसीने दर्शविल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. पण खर्च किती येईल यांचा आराखडा महापालिकेकडे तयार नाही. याबाबत मक्ता महापालिकेने काढला आहे. महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या देगाव मलनिस्सारण केंद्रास एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात डी. मुखर्जी, व्ही. के. मुखोपाध्याय, एल. के. नायक, विनोद कुमाार, शिरीष बारकल, अनिल कुमार, व्ही. मधू, महापालिकेचे यू. बी. माशाळे, अरविंद्र सिद्राल, दिलीप पंडित, संतोष शिर्के आदी उपस्थित होते.

९० एमएलडी पाणी प्रकल्पाला लागणार
एनटीपीसी एक जलवाहिनी महापालिकेस देऊन त्यापोटी त्यांना ९० एमएलडी पाणी द्यावे लागेल. तीन मलनिस्सारण केंद्राच्या आराखड्यानुसार देगाव ७५ एमएलडी तर प्रतापनगर १५ आणि कुमठे येथे १२.५ असे १०२.५ एमएलडी सांडपाणी मिळू शकेल. पण एनटीपीसीला ९० एमएलडीची गरज आहे.

देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात पाण्याच्या हौदात सांडपाणी सोडून प्राथमिक चाचणी करण्यात येत आहे.

केंद्रांच्या अध्यादेशामुळे महापालिकेचे १०० कोटी वाचणार
एनटीपीसीने प्रक्रिया केलेले सांडपाणी स्वखर्चाने घेण्याचा अध्यादेश केंद्राने काढल्यामुळे महापालिकेचे पैसे वाचणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी एनटीपीसीपर्यंत नेण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो खर्च लोकसहभागातून (पीपीपी) करण्याचा विचार मनपाचा होता. यासाठी मनपाने चीनकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार चीनचे एक पथक सोलापुरात आल्यावर देगाव मलनिस्सारण केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती. यावर अद्याप निर्णय नाही.

केंद्र सरकारकडून जीआर निघाला आहे. त्यानुसार एनटीपीसी परिसरातील ५० किमी अंतरावरील शहरातील सांडपाणी एनटीपीसी घेऊन जाणार आहे. त्यामुळे एनटीपीसी अधिकाऱ्यासोबत बैठक झाली. त्यानुसार पंधरा दिवसात मनपा संबंधित विभागास अहवाल देईल. विजयकुमार काळम पाटील, मनपाआयुक्त