आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एनटीपीसी’च्या जलवाहिनीने पाणी घेणे तांत्रिक, आर्थिक दृष्ट्या सोयीचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील जलसंकटावर मात करण्यासाठी उजनी जलाशयातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याऐवजी एनटीपीसीच्या जलवाहिनीतून पाणी घेण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही योजना तांत्रिकदृष्ट्या मनपास फायद्याची ठरणार आहे. याशिवाय आर्थिक बाबीने परवडणारी आहे. विजापूर नाक्याजवळ जोड घेण्यासाठी फक्त २५ लाख रुपये खर्च येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
एनटीपीसी जलवाहिनीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून त्यातून शहरासाठी पाणीपुरवठा करण्याची कल्पना पुढे आली आहे. विजापूर नाका जवळ एनटीपीसी जलवाहिनी गेली असून तेथे औजहून सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्राकडे येणारी जलवाहिनी आहे.

शहराची रोजची गरज सुमारे १३५ एमएलडी (दशलक्ष लिटर) आहे. महापालिकेच्या सध्या असलेल्या उजनी-सोलापूर जलवाहिनीतून सुमारे ७० एमएलडी पुरवठा होतो. एनटीपीसीच्या जलवाहिनीमुळे ८० एमएलडीची भर पडेल.

दिवसांत पाणीपुरवठा
‘एनटीपीसी’जलवाहिनीतून पाणी घेतल्यास २० एमएलडी जादा पाणी शहरासाठी मिळेल. त्यामुळे शहरात तीन दिवसांआड ऐवजी दोन दिवसांआड किंवा दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकेल.

अंदाजे २५ लाख खर्च
१२००एमएमच्या एनटीपीसी जलवाहिनीस जोड देण्यासाठी फक्त २५ लाख खर्च येणार आहे. हे काम दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल. त्यासाठी शासन पातळीवर मंजुरी, विशेषत: एनटीपीसीची मंजुरी आवश्यक आहे.

लेखी करार होण्याची गरज
‘एनटीपीसी’जलवाहिनीतून पाणी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी तत्त्वता मान्यता दिली असली तरी लेखी मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका ‘एनटीपीसी’ यांच्यात तात्पुरता करार होणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महांडळाच्या (एनटीपीसी) आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील औष्णिक वीज प्रकल्पाची उजनी धरणापासून जलवाहिनी आहे. ती सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याबाबतचा निर्णय मंत्री स्तरावरच होईल. सध्यातरी या बाबतीत स्थानिक पातळीवर कोणत्याच सूचना आलेल्या नाहीत, असे येथील ‘एनटीपीसी’ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान येत्या वर्षभरात कधीही प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी पाण्याची आवश्यकता आहेच. पण प्रकल्प सुरू होईपर्यंतच्या कालावधीत उजनी जलवाहिनीतून शहरासाठी पाणी घेता येऊ शकते. तसा प्रयत्न झाला तर दुष्काळातील सोलापूरची पाण्याची समस्या दूर होऊ शकते. तसा प्रयत्न केंद्रीय मंत्री स्तरावर होऊ शकतो. रविवारी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पातील जलवाहिनी सोलापूरसाठी वापरण्याची सूचना केली होती. आता केंद्रात प्रयत्न करून त्याला मंजुरी मिळावावी लागेल. त्याबाबतची प्रतीक्षा आहे.

आयुक्त, ‘एनटीपीसी’ यांची संयुक्त बैठक घेणार : मुंढे
‘एनटीपीसी’ च्याजलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. डिसेंबरमध्ये सोलापूर शहराला पाणीपुरवठा होईल, त्यादृष्टीने काम पूर्ण करण्यात येईल. एनटीपीसी जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आयुक्त सोलापुरात आल्यानंतर तातडीने एनटीपीसी आणि महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात येईल. जिल्हाधिकारी, महापालिका एनटीपीसी यांची जबाबदारी काय आहे ? किती कालावधीत काम पूर्ण करता येईल ? याचा निर्णय घेण्यात येईल. त्यादृष्टीने संबंधित विभागाला आदेश देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.