आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून फुलतेय हिरवळ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील विविध प्रशासकीय कार्यालयातून 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश आता नुसत्या विचारातून नव्हे प्रत्यक्ष कृतीतून दिला जात आहे. अधिकारी कर्मचारी यांच्या श्रमातून उजाड आवारावर आता हिरवळ फुलताना दिसत आहे. अनेक कार्यालयात श्रमाला छंदाची जोड देऊन बागा फुलवल्या आहेत. मृगाच्या पावसामुळे या हिरवाईला बहार आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

झेडपी आवारात औषधी उद्यान
जिल्हा परिषद आवारातील शंकरराव मोहिते- पाटील पुतळ्यासमोरील परिसरात औषधी उद्यान उभारले जात आहे. यामध्ये कडुनिंब, गुळवेल, गुगळ, तुळस, कोटफळ, बेल आदी झाडे आहेत. याठिकाणी पूर्वीपासून हिरवळ आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि प्रशासन विभाग मिळून बाग फुलवली आहे.

रेल्वे स्टेशन परिसरातही हिरवळ
रेल्वे स्टेशन परिसरात फलाट क्रमांकच्या दिशेने गुडशेडच्या बाजूला असलेल्या पाणी टाकीच्या समोरील बाजूस हिरवळ फुलवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर विविध शोची झाडेही लावण्यात आली आहे. गेल्या सात ते आठ महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम आज छोट्याशा उद्यानाच्या रूपात दिसत आहे.

राज्य उत्पादन विभागात फुलबाग
रेल्वे लाइन परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मागील बाजूस छोटे सुंदर असे उद्यान तयार करण्यात आले आहे. येथे हिरवळ फुलवून विविध झाडेसुद्धा लावण्यात आली आहेत. फुलांच्या झाडांच्या सुंदर अशा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. याची मांडणी उत्तम केल्यामुळे येथे लहान अशा उद्यानातच आल्याचा भास होतो.

मंद्रूप ग्रामपंचायत
मंद्रूप ग्रामपंचायतीच्या वतीने सरकारी दवाखाना, जनावरांचा दवाखाना, स्मशानभूमी, क्रीडा संकुल, मंद्रूप ते नाईकनगर तांडा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. फक्त वृक्षारोपण केले नसून त्याला वाढवण्याचे काम केले जात आहे. झाडांची व्यवस्थितपणे देखभाल होत असल्यामुळे उन्हाळाच्या प्रचंड उन्हातही या झाडांचे काहीही नुकसान झाले नाही.

पोलिसांनी जोपासला छंद
पूर्वी सदर बझार पोलिस ठाण्याच्या परिसरात विविध रोपे लावून पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी बाग फुलवली होती. ती आजतागायत आहे. यानंतर नव्याने सुरू झालेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्यातसुद्धा चारही बाजूने झाडे लावून हिरवळ फुलवण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयात समोरील आणि बाजूच्या परिसरात उत्तमपणे हिरवळ फुलवण्यात आली आहे. शोभेची आणि विविध प्रकारची रोपे लावण्यात आली असून योग्य पद्धतीने निगा राखली जात आहे. सध्या जेलरोड पोलिस ठाण्याच्या परिसरात समोरील बाजूस रोप लावण्याचे काम सुरू आहे. खत टाकून दररोज पाणी देऊन झाडे जगवण्याचे कार्य केले जात आहे. यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...