सोलापूर - आनंद आणि उत्साह, काहीशी हुरहुर अनुभवत विद्यार्थ्यांनी शाळेचा पहिला दिवस अनुभवला. बहुतांश शाळांनी गुलाबपुष्पे देत, पाकळ्यांची उधळण आणि औक्षण करत मुलांचे स्वागत केले. शहरातील १५० शाळांत सुमारे ८५ हजार विद्यार्थी उत्साहात दाखल झाले. महापालिकेच्या ६० शाळांतून सुमारे हजार ५०० विद्यार्थी उपस्थित होते. बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी १०० टक्के उपस्थिती दिसली.
अनेक शाळांनी पुस्तके, झाडांची रोपे देऊन स्वागत केले. फुगे, पताका लावून शाळांचे सुशोभीकरण केले होते. परिसरात रांगोळी काढण्यात आली होती. रंगीत पताके लावण्यात आले होते. काही शाळांच्या परिसरात मुलांचे आवडते कार्टून, मिकीमाउस, छोटा भीम, मोगली, डोरेमॉन, मोटू पतलू, चुटकी, नोबिता, सुझुका यांचीही उपस्थिती दिसून आली.
दमाणीमध्ये मनोरंजन कार्यक्रम
दमाणीविद्या मंदिरात नर्सरी विभागातील विद्यार्थ्यांचे रोपे, फुले, फुगे देऊन औक्षण करण्यात आले. अंबादास कनकट्टी यांनी नकला करून मुलांचे मनोरंजन केले. पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. संस्थेचे सचिव नंदकिशोर भराडिया, सदस्य नयन नोगजा, कालिदास जाजू, कमलकिशोर फोफलिया, मंजूषा राठी, मुख्याध्यापिका निर्मला भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.