आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी मुदत 15 सप्टेंबर, दीड लाख शेतकरी अजून अर्ज भरण्याच्या रांगेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कर्जमाफीचे अॉनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून, अद्यापही जिल्ह्यातील कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दीड लाखाहून अधिक शेतकरी रांगेत आहेत. गेली आठवडाभर ऑनलाइन केंद्रामध्ये सर्व्हरमधील अडचणीमुळे अर्ज भरण्याचा वेग मंदावला आहे. यामुळे आता शासन पुन्हा अर्ज भरण्याची मुदत वाढवणार का? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील लाख २४ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, मुदतवाढीबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली. 
 
जिल्ह्यातील २४ जुलै ते १० सप्टेंबर या कालावधीत किती शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले? यातील किती शेतकरी पात्र ठरले? याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध नाही. जिल्हा उपनिबंधक देशमुख यांनी लाख ६९ हजार ९०१ कुटुंबांनी ऑनलाइन अर्ज भरले असून, लाख ३९ हजार ५५५ सदस्य कर्जमाफीसाठी नोंदणी केल्याचे स्पष्ट करीत आहेत. यामुळे किती शेतकरी पात्र ठरले? किती शेतकरी अद्याप अर्ज भरण्याचे राहिले आहेत? याची अचूक नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दीड लाख रुपयांच्या आतील ६३ हजार ४८६, कर्ज पुनर्गठित केलेले ८५७ तर नियमित कर्जफेड केलेले ७१ हजार ५६१ शेतकरी आहेत. यांना अनुक्रमे ५२३ कोटी ७९ लाख, कोटी ४६ लाख १०५ कोटी २२ लाख रुपयांचा निधी लागणार अाहे. राष्ट्रीयीकृत बँकांची आकडेवारी अद्यापही प्राप्त झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांचे कर्ज थकित आहे? किती शेतकऱ्यांना माफी मिळणार आहे? याबाबतची आकडेवारी स्पष्ट केली जात नाही.   
 
शासनाने मुदतवाढ द्यावी 
कर्जमाफीचा अर्ज क्लिष्ट आहे. शिवाय ऑनलाइन प्रक्रिया असल्याने अद्यापही शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. १५ सप्टेंबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत असली तरी किती कर्ज थकले आहे. त्याचा अाकडा अद्यापही शासनाकडे नाही. शिवाय शासनास हा मुद्दा गांभीर्याने हाताळायचा असेल तर शासन शेतकरी कर्जमाफीला मुदतवाढ देईल. ज्यांचे कर्ज थकले, त्या सर्वांना याचा लाभ मिळेपर्यंत शासनाने अर्ज स्वीकारले पाहिजेत. 
- खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना 
 
मुदतवाढीची सूचना आलेली नाही 
जिल्ह्यातील एकूण एक लाख ६९ हजार कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहेत. उर्वरित दोन दिवसांत अधिकाधिक शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. १५ सप्टेंबर अंतिम मुदत आहे. त्यानंतर अर्ज घ्यायचे का नाही? अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळणार का? याबाबतच्या सूचना राज्य सरकारकडून आल्या नाहीत. 
- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक 
 
तीन दिवसांपासून रांगेत आहे 
मी गेल्या तीन दिवसांपासून कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी सोलापूरला येतोय. अक्कलकोट येथेही गर्दी आहे. सर्व्हर बंद आहे, कधी चालत नाही. कधी चालतो. यामुळे रोज चकरा मारत आहे. आजही अर्ज भरला जाईल याची शक्यता नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज काढले होते. 
- मल्लिनाथ पाटील, कडबगाव (ता. अक्कलकोट) 
 
कधी नेटवर्क मिळेल, तेव्हा अर्ज भरेन 
दोन दिवसांपासून अर्ज भरण्यासाठी आलोय. सोय केली असल्याचे सांगत आहेत. मात्र अर्ज भरला जात नाही. नेटवर्क नाही, स्पीड नसल्याचे सांगतात. यामुळे आता मुदतीत अर्ज भरणार की नाही? याची चिंता आहे. नेटवर्क नसल्याने अर्ज भरला नाही. नेटवर्क येईल तेव्हा अर्ज भरणार आहे. 
- दत्तात्रय पाटील, गुंजेगाव (ता. दक्षिण सोलापूर) 
 
यंत्रणेत काही दोष असतील तर दूर करू 
कर्जमाफीचे अर्ज भरण्याची १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत असल्याने सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी पडली आहे. यामुळे सर्व्हरवरही ताण आला आहे. तरीही अधिकाधिक अर्ज भरून घेण्याचा प्रयत्न आहे. याबाबत काय अडचणी आहेत, याची संबंधित महा सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यांच्याकडून माहिती घेऊन मार्ग काढू. 
- अजित रेळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी 
बातम्या आणखी आहेत...