आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेपंधरा लाख घनमीटर खोदाई, एक अब्ज 55 कोटी लिटर होईल जलसाठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जलसंवर्धनासाठी गेल्या ४५ दिवसांपासून तालुक्यातील ३० पैकी १६ गावांत सुरू असलेल्या वाॅटर कप स्पर्धेचा समारोप झाला. श्रमदानातून या गावांमध्ये १५ लाख ५६ हजार घनमीटर खोदाई करण्यात आली. यामुळे पावसानंतर एक अब्ज ५५ कोटी ६० लाख लिटर पाणीसाठा निर्माण होईल, हा अंदाज आहे. त्यातून ही गावे टंचाईमुक्त होतील.आता या गावांची पावसाकडे आणि स्पर्धेच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेने काही गावांचे रूपडे पालटले अाहे. त्याची सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 

सिनेअभिनेता अामिर खान, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पौळ यांच्या पाणी फाउंडेशनमार्फत जलसंवर्धनासाठी एप्रिल ते २२ मे या कालावधीत सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील ३० गावांनी सहभाग नोंदवला. यात भागाईवाडी, हिरज, बेलाटी, राळेरास, कोंडी, नान्नज, रानमसले या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत तर पडसाळी, अकोलेकाटी येथे चांगला प्रयत्न झाला आहे. श्रमदानातून ही कामे करणे हे या स्पर्धेचे निकष होते. त्यानुसार राळेरास, हिरज, बेलाटी, भागाईवाडी, नान्नजमध्ये श्रमदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांसह प्रौढ आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दरम्यान, महाश्रमदान दिनाचेही आयोजन केले गेले. यात हिरज येथे सिनेअभिनेता आदिनाथ कोठारे सहभागी झाला होता. 

स्पर्धे आधी पाणी फाउंडेशनने सहभागी गावातील पाचजणांना सातारा येथे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर भारावलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात कामे सुरू केली. हिरज येथे अशा कार्यकर्त्यांना ग्रामस्थांचे पाठबळ लाभले तर काही गावात कार्यकर्त्यांनी एकाकी झुंज दिली. सुरुवातीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सिनेअभिनेता अामिर खान याने ग्रामस्थांशी संवाद साधत प्रोत्साहित केले. १२ एप्रिलला त्याने पत्नी किरणसह श्रमदान केले आणि कामाला गती आली. श्रमदानासह यंत्राद्वारेही कामे झाली. कोंडी, रानमसले, नान्नज येथे ओढा खोलीकरण चांगल्याप्रकारे झाले. त्याचे परिणाम पावसानंतर दिसतील. 
 
भागााईवाडी (ता. उत्तर सोलापूर)ग्रामस्थांनी वाॅटर कप स्पर्धेअंतर्गत जलसंवर्धनासाठी श्रमदानातून चर खोदाई केली आहे. अशाप्रकारे तालुक्यातील १६ गावांमध्ये काम करण्यात आले आहे. या ग्रामस्थांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर या ठिकाणी पाणी साचून मुरल्यानंतर जमिनीत जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. 

वृक्षाराेपणासाठी पाच हजार खड्डे 
बेलाटीसाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, हिरजसाठी साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले. भारतीय जैन संघटना, शहरातील डॉक्टर, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांसह विविध संघटनांनी श्रमदान केले. यात पोलिस मुख्यालयातील निरीक्षक नाना कदम यांच्यासह पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचाही सहभाग राहिला. या श्रमदानातून वृक्षारोपणासाठी पाच हजार खड्डे खोदण्यात आले. 

अखंडपणे चालणार जलसंवर्धनाची चळवळ 
वाॅटरकप स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा गावागावांत नव्हे तर दुष्काळाशी आहे. काही गावांमध्ये अविस्मरणीय काम झाले. काहीनी ही संधी गमावली. काही गावांनी निरंतर श्रमदानाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जलसंवर्धनाची चळवळ अखंडपणे चालणार आहे. यामुळे भूगर्भात जलासाठा वाढण्यास मदत होणार आहे. 
- विकास गायकवाड, तालुका समन्वयक, पाणी फाउंडेशन 

वाॅटर कपस्पर्धेसाठी ग्रामस्थांसह सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणेचे सहकार्य लाभले. गाव पाणीदार करण्याची आम्हाला संधी मिळाली. झालेल्या कामातून आमच्या गावाचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. स्पर्धेतून सुरू झालेली ही जलसंवर्धन चळवळ निरंतर राहील.
- कविता घोडके, सरपंच, भागाईवाडी 
बातम्या आणखी आहेत...