आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 121 शेतकऱ्यांना 10 हजार अग्रीम, उस्‍मानाबादेतील 13 बँकांचा शासन आदेशाला ठेंगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कर्जमाफीच्या घोषणेनंतर शासनाने शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी प्रत्येकी १० हजार रुपये पीककर्जापोटी अग्रीम देण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. परंतु, शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अर्ज करूनही जिल्ह्यात केवळ १२१ शेतकऱ्यांनाच प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे १२ लाख १० हजार रुपये देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश बँकांनी सरकारच्या या निर्देशाला ठेंगा दाखविल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 
 
शेतकऱ्यांच्या संपाच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने निकषाच्या अाधीन राहून राज्यभरातील दीड लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ केल्याची घोषणा केली. परंतु, यासाठी लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे दीड महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीच्या निकषामध्ये बसतो की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यातच खरिपाच्या पेरणीसाठीही हातात पैशाची गरज असल्याने शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १० हजार रुपये अग्रीम वाटपाचे निर्देश राज्य शासनाने दिले. परंतु, पहिला पंधरवडा तर बँकांनी आमच्याकडे अर्जच आले नाहीत म्हणून या रक्कम वाटपाच्या कामाबाबत हात वर केले. याबाबत प्रसार माध्यमांसह शेतकऱ्यांमधून ओरड वाढल्यानंतर अखेर शासनाचे आदेश बँकांच्या मुख्यालयात धडकले आणि तेथून शाखास्तरावर आले. 

मात्र, सदरची रक्कम वाटप करताना असणाऱ्या अनेक अडचणी, अटींमुळे ‘मदत नको, पण अटींना आवर घाला’ असेच म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. घोषणेनंतर तब्बल महिनाभराने प्रत्यक्षात १० हजारांची अग्रीम वाटपाला प्रारंभ होऊन जुलै अखेरपर्यंत १२१ शेतकऱ्यांनाच १२ लाख १० हजार रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली होती. बँकांकडे शेकडो शेतकऱ्यांचे अर्ज दाखल आहेत. परंतु, वाटपाबाबत दिरंगाई का, याचा बँकांना कोणीच जाब विचारत नसल्याने नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी कायम आहेत. 
 
शेतकऱ्यांची आर्थिक मदार जिल्हा बँकेच्या ९८ शाखांवर आहे. या बँकेने सोसायटी स्तरावर १० हजार अग्रीमसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याच्या सूचना दिल्या. बँक अधिकारी कर्मचारी पीकविम्याच्या कामातच व्यस्त आहेत. १० हजाराची मागणी करणारे किती अर्ज सोसायटी अथवा शाखा स्तरावर जमा झाले, आकडेवारीही मुख्यालयाकडे नाही. राज्य शिखर बँकेने २० कोटींची तरतूद करून जिल्हा बँकेने यादी पाठविताच रक्कम देऊ असे सांगितले. शेतकऱ्यांची मदत या दोघात लटकली आहे. 
 
सव्वाशेवर बँका; मदत १२१ शेतकऱ्यांनाच 
जिल्ह्यात जवळपास सव्वाशेवर राष्ट्रीयीकृत जिल्हा बँकांच्या शाखा आहेत. प्रत्येक बँकेकडे शेकडाे शेतकऱ्यांनी १० हजार रुपयांची मदत मिळावी याकरिता अर्ज केले आहेत. परंतु, यापैकी केवळ बँकांनी १२१ शेतकऱ्यांना ही रक्कम दिली आहे. उर्वरित बँकांनी राज्य शासनाच्या आदेशाला ठेंगा दाखविल्याचे दिसून येत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...