आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर तुमचा, मालक, बापूंवर भरोसा नाय का; नागरी प्रश्नाबाबत विरोधकांचा महापालिकेला सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरचे खड्डे कसे खोल खोल, पाण्याचे नियोजन कसे फेल फेल, महापौर तुमचा मालक बापूवर भरोसा नाही का? असा सवाल करत महापालिकेतील विरोधी नगरसेवकांनी गुरुवारी महापालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन केले. दिवसभर चाललेल्या या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसप, माकपच्या ३२ नगरसेवकांनी सहभाग घेतला. शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले. आंदोलनाची दखल घेणाऱ्या महापौरांचा निषेध करण्यात आला. 
 
शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन डेंग्यूसारख्या आजाराने बालके मरण पावताहेत. ठिकठिकाणी कचरा साचला आहे. तो उचलला जात नाही, पावसाळ्यात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, रस्त्यावर खड्डे पडले असून ते दुरुस्त केले जात नाही. या नागरी प्रश्नासह विविध प्रश्नाबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक एकत्र येऊन महापालिका आयुक्त कार्यालयासमाेर हे आंदोलन केले. शहरात अनेक नागरी प्रश्न तीव्र होत असताना सत्ताधारी भाजप ते सोडवत नाही. बैठका घेण्यात येतात, पण त्यातून निष्पन्न काही होत नाही. अंतर्गत राजकारणामुळे शहराचे नुकसान होत आहे.
 
प्रशासन काम करत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगत सत्ताधारी भाजप, मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दिवसभर चाललेल्या आंदोलनात काँग्रेसचे १४, राष्ट्रवादीचे ४, एमआयएमचे ९, बसपचे ४, माकपचे अशा ३२ नगरसेवकांनी सहभाग घेतला. दखल घेतली नसल्याचे सांगत महापौरांचा निषेध करणारे नगरसेवक सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी यांच्याबाबत काहीच बोलले नाहीत.  

मनपा अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे 
नगरसेवकआंदोलन करत असताना तेथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत म्याकलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, मुख्य लेखापाल दत्तात्रय लोंढे, आरोग्य अधिकारी डाॅ. जयंती आडकी यांनी नगरसेवकांशी चर्चा करून माहिती दिली. त्यांच्या मागण्याबाबत शुक्रवारी बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
 
विरोधक अचानक लढ्यात कसे 
मनपा बजेट एकमताने मंजूर करताना सत्ताधाऱ्यांच्या समवेत असणारे विरोधी नगरसेवकांनी आज भूमिका बदलत आंदोलन केले. शिवाय विषय समिती निवडीवेळी विरोधकांना एकत्र करणारे विरोधी पक्षनेते महेश कोठेसह शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले. 
 
नागरी प्रश्नांचे गांभीर्य हरवले 
राज्यभरात सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? हे गीत गाजत आहे. याच गाण्याच्या धर्तीवर महापौर तुमचा, मालक, बापूंवर भरोसा नाही का असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दरम्यान सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना गाण्यातूनच प्रतिउत्तर दिले. करमणूक प्रधान आंदोलनाने प्रश्नांचे गांभीर्य मात्र हरवले. 
महापालिका आयुक्त कार्यालयासमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. 
 
जनहितासाठी आंदोलन 
जनहितासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. नागरी प्रश्नासाठी विरोधी पक्षाची भूमिका बजावणे आवश्यक आहे. नगरसेवक आंदोलन करत असताना महापौर पदाधिकाऱ्यास येणे अपेक्षित असताना ते आले नाही. त्यामुळे त्यांचा निषेध केला. 
- आनंद चंदन शिवे, बसप गटनेता 
 
आंदोलन करण्यापूर्वी चर्चा केली असते तर मी त्यांना सांगितले असते. पाणीपुरवठा, आरोग्य, कचरा यावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे आंदोलन मला माहीत नाही. 
- शोभाबन शेट्टी, महापौर 
 
बजेट एकमताने केले, नियोजन समिती निवडणूक बिनविरोध झाली. सर्व बरोबर असताना कामकाज करत असताना आताचे आंदोलन म्हणजे स्टंट आहे.
- सुरेश पाटील, सभागृह नेता 
 
बातम्या आणखी आहेत...