आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपले पाणी आपल्याच शिवारात अडवावे : मुंढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला - वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढील पिढ्यांचा विचार करून आपले पाणी आपल्याच शिवारात अडवले पाहिजे. पीकपद्धती बदलून ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. शेती हा उद्योग म्हणून केल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, टंचाई, जलयुक्त शिवार अभियान कार्यशाळा सांगोल्यातील अहिल्यादेवी होळकर सभागृहात शनिवारी दुपारी पार पडली. मुंढे म्हणाले, आपत्कालीन योजना या आपत्कालीन राहिल्या नाहीत. गेल्या २० वर्षांत त्या कायमस्वरुपीच झाल्या आहेत. हे कुठे तरी बंद झालेच पाहिजे. नैसर्गिक संपत्तीचा दुरुपयोग आपण करीत असल्यामुळे संकटे ओढावत आहेत. ऊस केळी ही पिके सोडून दुसरी पिके ठिबक सिंचनाच्या आधारे घेतल्यास आहे त्या पर्जन्यमानातही भरपूर उत्पन्न मिळण्यासारखे आहे. स्वत:च्या शेतातील पाणी आडवता ते वाया जाऊ द्यायचे आणि पुन्हा दुसरीकडून टँकरने पाणी आणून बागा जगवायच्या हा कुठला व्यवहार आहे.

एकट्या सांगोला तालुक्यात १०३ गावांसाठी १८५ पाझर तलाव, दोन मध्यम प्रकल्प, २२० सिमेंट नाला बांध, ५३ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असे एकूण ४७० योजना राबवल्या तरीही पाणी नाही. संपूर्ण जिल्ह्यात २७० पाझर तलावांची दुरुस्ती केल्याचे सांगून १००० कोटींचे कर्ज ठिबक सिंचनासाठी दिले. शेतकऱ्यांनी आपली शेती ही ठिबक शेडनेट पद्धतीने केली तर त्याचा फायदा त्यांना होणार आहे, असे श्री. मुंढे म्हणाले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कर्मचाऱ्यांचा गौरव
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या विविध गावच्या सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामसेवक, तलाठी यांचा सत्कार जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला.
छायाचित्र: सांगोला येथे दुष्काळ आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे.