आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत बिलांमुळे टेंडर प्रक्रियेवर पालिका मक्तेदारांचा बहिष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्थानिक संस्था करातून (एलबीटी) मिळणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे महापालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. त्यामुळे अन्य करांच्या वसुलीवर भर देण्यात येत आहे. उद्दिष्टापेक्षा कमी वसुली केल्याचे सांगत मंगळवारी तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, मक्तेदारांची थकीत बिले त्वरित देण्यात यावीत मागणीकरता महापालिका मक्तेदार संघटना बुधवारपासून आंदोलन करणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत टेंडर प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. दुरुस्तीची कामे बंद ठेवण्यात येणार आहेत.

महापालिकेत सुमारे २५० मक्तेदार असून केलेल्या कामाची बिले त्यांना वेळेवर मिळत नाहीत. त्याची रक्कम ५० कोटी रुपये इतकी झाली आहे. दसरा आणि दिवाळी उत्सवाकरता मनपाकडून प्रत्येकी लाख रुपये देण्याचे मनपा आयुक्तांनी मान्य केले. याला मक्तेदार राजी नाहीत. महापालिका आवारात मंगळवारी दुपारी याबाबत चर्चा करण्यास मक्तेदारांची बैठक झाली. त्यानंतर महापौर यांची भेट घेऊन निवेदन दिले. टेंडर प्रक्रियेवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे सूर्यकांत भोसले यांनी सांगितले.

जनजीवनावरपरिणाम
शहरातीलदेखभाल दुरुस्तीची कामे बंद केल्याने ड्रेनेज लाइनची दुरुस्ती, किरकोळ पाइपलाइन दुरुस्तीसह इतर कामे थांबणार आहेत. यामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वसुली कमी आणल्याने तीन कर्मचारी निलंबित
उद्दिष्टापेक्षाकमी उत्पन्न आणल्याने महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी मनपातील तीन कर्मचाऱ्यांना मंगळवारी निलंबित केले. यात कर आकारणी, हद्दवाढ आणि गलिच्छ वस्ती सुधारणा विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. कनिष्ठ श्रेणी लिपिक दत्तात्रय उत्तम दंदे (कर आकारणी), एन. डी. मंठाळकर (हद्दवाढ) आणि व्ही. टी. देशमुख (गलिच्छ वस्ती सुधारणा) यांना निलंबित करण्यात आले. देशमुख यांनी ५० टक्केऐवजी ४.५४ टक्के वसुली केली. दंदे यांची १.०४ टक्के तर मंठाळकर यांची १२.६३ टक्के वसुली झाली.