आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Padmashali Community Marriage In Only 3.5 Thousand In Nagar

पद्मशाली समाजासाठी साडेतीन हजार रुपयांत लग्न, ज्ञातीची योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विडी कारखाने बंद असल्याने कामगारांच्या मुला-मुलींची लग्ने पुढे ढकलली जात आहेत. प्रचंड आर्थिक आेढाताण सुरू झाल्याने काही कामगार कुटुंबं अस्वस्थ झाली आहेत. ही स्थिती पाहून पद्मशाली ज्ञाती संस्थेने ‘साडेतीन हजार रुपयांत लग्न’ अशी योजना सुरू केली. मुहूर्त काढायचे आणि मार्कंडेय मंदिरात जाऊन बसायचे. मणिमंगळसूत्र, जोडवे, वस्त्रे, भांडीकुंडी अगदी पौराेहित्याचा खर्चही समाजातील दानशूर देणार. कामगार कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी ही योजना असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष बालराज बोल्ली यांनी सांगितले.
धूम्रपानविरोधी कायद्यातील जाचक अटींना विरोध करत विडी उत्पादकांनी एक एप्रिलपासून कारखाने बंद ठेवले. त्यामुळे विडी कामगार महिलांची आर्थिक कोंडी झाली. बचत गट, मायक्रो फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्याच्या तणावात काही महिलांनी आत्महत्या केली. अनेक महिलांनी तसे प्रयत्नही केले होते. या क्षेत्रात प्रामुख्याने पद्मशाली समाजातील महिला आहेत. त्यांची झालेली आर्थिक आेढाताण लक्षात घेऊनच समाजाने हा उपक्रम सुरू केला.

गुजरातचा प्रकार रोखला
पद्मशालीसमाजातील कामगार कुटुंबं विडी उद्योगावरच चालतात. आर्थिक असहायतेमुळे मध्यंतरी त्यांच्या मुली गुजरातला देण्याचा प्रकार सुरू झाला होता. कोण, कुठले या बाबी पाहताच मुली गुजरातला जात होत्या. नंतर किरकोळ कारणांवरून त्या मुलींना सोडून देण्यात येत होते. हा प्रकार रोखण्यासाठीच ‘अडीच हजार रुपयांत लग्न’ ही योजना सुरू केली होती. तीच योजना आताही आहे. त्यात केवळ एक हजार रुपयांची वाढ केली. कामगारांनी नि:संकोच या उपक्रमात सहभागी व्हावे.” बालराज बोल्ली, उद्योजक

कसे सहभागी व्हाल?
सोयीचामुहूर्त पाहून आठ दिवस अगोदर मार्कंडेय मंदिरात नावनोंदणी करावी. शंभर रुपयांच्या मुद्रांकावर संबंधित उपवर-वधूंचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येते. ज्यामुळे विवाहासंदर्भात कुठलाच वाद उद्भवणार नाही. त्यानंतर साडेतीन हजार रुपये भरायचे. मुहूर्ताच्या दिवशी सर्व साहित्य मंदिरात आणून मंदिरातीलच पुजारी मंडळी विधिवत हा सोहळा करतात. यात एक महत्त्वाचे आहे. उभयतांच्या पाहुण्यांचा जेवण खर्च संबंधित कुटुंबीयांना करायचा आहे. त्यासाठी साहित्य मात्र मोफत पुरवले जाईल.