आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मशाली, कुरुहिनशेट्टी समाज महापालिका निवडणुकीस सज्ज, बैठकांतून समाजाचे प्रतिनिधी पाठवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पूर्वभागातील तेलुगू भाषिक घटकांनी महापालिकेत निवडणुकीच्या माध्यमातून समाजाचे प्रतिनिधी पाठवण्याचा निर्धार केला. पद्मशाली आणि मद्विरशैव कुरुहिनशेट्टी (जाण्ड्रा) ज्ञाती संस्थांनी रविवारी बैठका घेतल्या. जाण्ड्रा समाजाने तर चक्क इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेटही घेतली. या हालचालींमुळे पूर्वभागातील तेलुगू भाषक मतांमध्ये परिणाम होण्याची शक्यता नकारता येत नाही. 

शहरात मोठ्या संख्येने असूनही अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून हे दोन्ही समूह पुढे सरसावले. जाण्ड्रा समाजाने त्याची सुरुवात केली. त्यानंतर पद्मशाली समाजाने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. पक्ष कोणताही असो, समाजाच्या उमेदवारालाच मत द्यायचे, असे त्यांनी ठरवले. त्यामुळे समाजबहुल भागात त्यांच्याच माणसाला संधी द्यावी लागेल, हे राजकीय पक्षांनाही कळेल. तसे नाही झाल्यास, समाज पुढील निर्णय घेईल, अशी चर्चाही या बैठकांतून झाली. 

पद्मशालींचे चिंतन 
मार्कंडेय मंदिरात झालेल्या बैठकीत पद्मशाली समाजाने राजकीय चिंतन केले. समाजाची संख्या मोठी असूनही राजकीय पक्ष अन्याय करतात. रामचंद्र जन्नू यांना भाजपने वंचित ठेवले. काँग्रेसने मेघनाथ येमूल यांना स्थायी सभापतीपासून रोखले. हा अन्याय आणखी किती सहन करायचा? समाजाची ताकद वाढली तरच राजकीय पक्ष नमते घेतील, अशी मते पुढे आली. या वेळी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, सरचिटणीस सुरेश फलमारी, अंबाजी गुर्रम, बालराज बोल्ली उपस्थित होते. 

तेलुगू भाषक विणकर समाज एकत्र असावा 
पूर्वभागातील तेलुगूभाषक हा प्रामुख्याने विणकर समाज आहे. तो एकत्रच असला पाहिजे. त्यासाठीच ‘नीलकंठ, कुरुहिनशेट्टी, कोष्टी महासंघ’ स्थापन केले. त्यांच्यात रोटी-बेटीचा व्यवहार सुरू केला. असे असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळे होणे योग्य नाही. महासंघाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी येत्या रविवारी बैठक आयोजित केली- नागेशवल्याळ, महासंघाचे कार्याध्यक्ष 

‘जाण्ड्रा’चे १० इच्छुक 
साखरपेठेतील नीलकंठेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत मद्विरशैव कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष बालाजी मुटकिरी, उपाध्यक्ष बालाजी येज्जा, सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा, विश्वस्त राजू कामूर्ती, राजेंद्र द्यावरकोंडा, श्रीनिवास बिच्चल, दीनानाथ धुळम, अरविंद अच्युगटला, अनिल धुळम, अंबादास पोगूल आदींनी इच्छुकांच्या भावना जाणून घेतल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून समाजबांधवांनी इच्छा व्यक्त केली. त्यांच्यात काही महिलाही होत्या. 
बातम्या आणखी आहेत...