आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीतून घडवला बदल: पैठणी विणणाऱ्यांनी ठरवले, स्वत:च बाजारपेठ मिळवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तेलंगण आणि कर्नाटकच्या सीमेवरील गदवाल, रायचूर येथून काही विणकर रोजगारासाठी सोलापूरला अाले. नई जिंदगीच्या मागील विष्णुनगरात खुल्या जागा घेऊन पत्र्यांची घरे उभी केली. त्यात खड्डा हातमाग चालवू लागले. मजुरीवर रेशीम साड्या विणण्यास सुरुवात केली. अतिशय सुंदर कलाकुसर. उत्पादित एका साडीची किंमत किमान २५ हजार रुपये. परंतु विणकरांच्या हाती तुटपुंजी मजुरी. खड्ड्यात पाय घालून घरटी एक दाम्पत्य १२-१२ तास खपून काम केले तरी अपेक्षित मोबदला नाही. वर्षानुवर्षे ही चाकरी झाली. शेवटी विणकर एकत्र आले. बँकेत गेले. भांडवल उभे केले. स्वत: व्यापाऱ्यांकडे गेले. मागणी मिळाली आणि मजूरमुक्त झाले.

नागरी विकासापासून कोसो दूर असणाऱ्या या विष्णुनगरात सुमारे ४० विणकरांची घरे आहेत. प्रत्येकाच्या घरी एक खड्डा हातमाग. त्याला लागून असलेल्या १० -१२ फरशांवर स्वयंपाकाची जागा आणि भांडीकुंडी. छतावरील पत्र्यांना छिद्रे. त्यामुळे दिवसा नेहमीच कवडसे. पावसाळ्यात धो-धो पाणी. हातमागावरील महागडा सूत वाचवण्याच्या धडपडीत कामच बंद करावे लागते. अशी ही विणकर मंडळी.

वस्त्रोद्योग खात्यातील एका जाणकाराने त्यांना शासनाची योजना सांगितली. त्यासाठी ६० जणांनी अर्ज केला. कॅनरा बँकेने अल्प व्याजदरात एक लाखाचे कर्ज दिले. दरमहा १३०० रुपये हप्ता ठरला. लाभार्थ्यांनी बंगळुरू येथून रेशीम सूत विकत घेतले. खड्डा हातमागावर जेकॉर्ड (पिंजरा) उभे केले. नव्या वाणाची साडी म्हणजेच ‘सोलापुरी पैठणी’ विणण्यास सुुरुवात केली. त्याला प्रचंड मागणी आली. व्यापारी आगाऊ पैसे देऊन मागणी नोंदवू लागले. कामाचा पुरेसा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली. गळकी पत्रे बदलले. स्वच्छतागृह बांधून घेतले. काहींनी पक्की घरेही बांधली. साधारण एकाच वर्षात हा बदल घडून आला.

कर्जातून मुक्ती
घरच्या गरजांसाठी कर्जे घेतली. मिळणाऱ्या मजुरीतून त्याची वजावट सुरू झाली. आधीच तुटपुंजी मजुरी. त्यात वजावट. त्यामुळे विणकर मंडळी वैतागलेली. ‘महात्मा हातमाग विणकर संघ’ संस्थेची स्थापना केली. लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. वस्त्रोद्योग राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे वचन दिले. पाठपुरावा केला. बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला. केवळ जिद्दीने हा बदल घडून आला. श्रीनिवास बंडा या संघटनेचे अध्यक्ष आहेत. राजू काकी (उपाध्यक्ष), पांडुरंग काकी (सचिव), अंबादास कुणे (सहसचिव), नागराज तवडू (खजिनदार), तुळशीदास पोतू, व्यंकटेश मादगुंडी, सुरेश मादगुंडी, श्रीनिवास काकी, जयंती तवडू, रुक्मिणी कोटूर हे सारे सदस्य.

कलाकुसरीत घरातीलमंडळींना घेऊन दिवसभर खपूनही अपेक्षित मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे स्वत: साड्या विणून त्या विकण्याचे ठरवले. व्यापाऱ्यांच्या दारात गेल्यानंतर अपेक्षेपेक्षा चांगलाच दर मिळाला. त्यांच्या गरजांप्रमाणे साड्या पुरवण्याचे काम सुरू झाले अाहे. व्यंकटेश मादगुंडी, विणकर