आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरसह चंद्रभागेचा कायापालट : मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- तीर्थक्षेत्रविकासाच्या माध्यमातून पंढरपूर शहर आणि चंद्रभागा नदीचा कायापालट करून त्याचे स्वरूप बदलून टाकू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारकऱ्यांना भजन आणि कीर्तन करण्यास वारीच्या काळात वीस दिवस परवानगी दिल्याने उच्च न्यायालयाचेही त्यांनी आभार मानले.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे रविवारी स्वच्छता दिंडी समारोपात श्री. फडणवीस बोलत होते. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार भारत भालके, आमदार रामहरी रूपनवर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, माधव भंडारी आदी उपस्थिती होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “निर्मल भारत अभियानाला पंतप्रधानांनी गती देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या या स्वप्नपूर्तीला राज्यातील जनतेने बळ द्यावे. स्वत: कचरा करणार नाही कचरा करू देणार नाही हा संकल्प सर्वांनी करावा. लोकप्रबोधनासह संत परंपरेने समाजाला पर्यावरणासोबत जगायला शिकविले आहे. उच्च न्यायालयाने वारकऱ्यांना वाळवंटात कीर्तन भजनासाठी परवानगी दिली आहे. नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यां अंतर्गत पंढरपूर शहर विकासासाठी चंद्रभागा नदीचे स्वरूप बदलण्यासाठी शासनातर्फे भरीव निधी दिला जाईल. राज्य निर्मल होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.” महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले, “स्वच्छतेबाबत संतांनी कृतिशील प्रबोधन केले आहे. वारकऱ्यांनी वाळवंट स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, ‘राज्यातील ६४ लाख कुटुंबं स्वच्छतागृहांपासून वंचित अाहेत.’ पालकमंत्री देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा गायकवाड, आमदार भालके यांचेही भाषण झाले.