आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम महाराज यांच्‍या पालखी सोहळ्याचे अकलूजमध्‍ये रिंगण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या सीमेवरील स्वागत स्वीकारल्यानंतर अकलूज येथे या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण झाले. संत तुकाेबारायांच्याच ‘आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।।’ या अभंगाप्रमाणे भाविकांनी पावसात हा अनुपम्य सोहळा आपल्या डोळ्यांत साठवला.

सराटी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील मुक्काम आटोपून संत तुकोबांची पालखी सकाळी आठ वाजता अकलूजकडे निघाली. तत्पूर्वी जिल्हा सीमेवरील नीरा नदीत पाणी नसल्याने महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. सकाळी साडेआठच्या सुमारास पालखी जिल्ह्यात आली. सीमेवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख आदींनी स्वागत केले. माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांनी या ठिकाणी पालखीचे सारथ्य केले. सकाळी १० वाजता पालखी येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर गोल रिंगणास प्रारंभ झाला.
प्रथमच स्क्रीनवर रिंगणाचे दर्शन : संत तुकोबांचा हा ३३१ वा पालखी सोहळा आहे. या पालखीचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथे होते. हे रिंगण पाहण्यासाठी अलोट गर्दी होते. यंदा जयसिंह मोहिते यांनी रिंगणाचे थेट दर्शन व्हावे यासाठी मैदानावर प्रोजेक्टर स्क्रीन लावल्या होत्या.
आज उभे रिंगण
तुकोबांची पालखी मुक्कामासाठी येथील पांडुरंगाच्या मंदिरात गेली. सोमवारी सकाळी नऊ वाजता माळीनगर येथे या पालखीचे उभे रिंगण होईल. येथील विसाव्यानंतर रात्री मुक्कामासाठी पालखी बोरगावकडे मार्गस्थ होईल.
माउलींचा सोहळा रंगला
सकाळपासूनच वारकऱ्यांचा उत्साह वाढवणारा भुरभुर पाऊस, ज्ञानोबा-तुकारामाचा गजर, त्यातच जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण नवीन ठिकाणी की जुन्याच ठिकाणी? या विषयाला पूर्णविराम मिळत रविवारी दुपारी पुरंदावडे येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले.

शनिवारचा नातेपुते येथील मुक्काम आटोपून माउलींची पालखी पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी पुरंदावडेकडे मार्गस्थ झाली. सकाळपासून रिंगण सोहळा होणाऱ्या ठिकाणी वारकऱ्यांची गर्दी जमू लागली. सकाळी ११ वाजेनंतर वारकऱ्यांच्या रिंगण सोहळ्याच्या मैदानावर खेळ रंगला. कोणी फुगडी, तर कोणी भजन-कीर्तन केले. माउलींच्या पालखीचे आगमन होण्यापूर्वी विठ्ठल-तुकारामाच्या जयघोषात तल्लीन झाले.

जसजशी माउलींची पालखी पुरंदावडेजवळ येत होती तसतशी मैदानावरील गर्दी वाढत आणि पाहता- पाहता मैदान भाविकांनी तुडुंब भरले. पताकाधारी, टाळकरी, पखवाजधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी माउलींच्या पालखीस रिंगण घातले. दुपारी २ वाजता माउलींच्या अश्वाचे विधिवत पूजन होताच ज्ञानेश्वर- तुकारामाच्या गजरात रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली. माउलींच्या अश्वाने दोन रिंगण पूर्ण करताच ज्ञानेश्वर-तुकारामाचा एकच जयघोष करत वारकऱ्यांनी अश्वाच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी झुंबड उडाली. रिंगणानंतर पालखी माळशिरस मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.
पुढे पाहा, रिंगणाचा फोटो..
बातम्या आणखी आहेत...