आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाेबांच्या पालखी साेहळ्याचे उभे रिंगण, बाेरगावात मुक्कामासाठी विसावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे उभे रिंगण सोमवारी (दि. ११) माळीनगर येथे झाले. महाळुंग-श्रीपूर आदी गावांतील स्वागत स्वीकारत तुकोबांची पालखी बोरगावात मुक्कामासाठी विसावली.

रविवारचा अकलूज येथील मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज यांची पालखी सकाळी साडेआठ वाजता माळीनगर येथे आली. गावच्या वतीने सरपंच आशा सावंत यांनी स्वागत केले. सकाळी नऊ वाजता सोहळ्यातील उभे रिंगण झाले. बाभुळगावकरांचा मानाचा अश्व व शिवसेना नेते डॉ. धवलसिंह मोहिते यांच्या अश्वाने दोन फेऱ्या मारल्यानंतर रिंगण सुटले. रिंगण सुटल्यानंतर वारकऱ्यांनी फुगड्यांचे फेर धरले. विसाव्यासाठी पालखी येथील मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर गेली. माळीनगर कारखान्याचे संचालक मोहन लांडे व त्यांच्या पत्नी संध्या या उभयतांच्या हस्ते पादुका पूजन झाले. या वेळी कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे यांनी सोहळा प्रमुखांचा सत्कार केला. माळीनगर कारखान्याच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालखी महाळुंगच्या दिशेने निघाली. गट नंबर दोन येथे माढा विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर आमदार बबनराव शिंदे, त्यांच्या पत्नी सुनंदा शिंदे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा जाधव, संभाजी जाधव, माढा कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार रणवरे, शेतकी अधिकारी सुनील बंडगर यांनी सोहळ्याचे स्वागत केले.
सवतगव्हाण, तांबवे, लवंग या गावांतील स्वागत स्वीकारून महाळुंगात पालखी आली. येथे सहकार महर्षी कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र सावंत, सरपंच उषा विजय भोसले, उपसरपंच शरद पाटील आदींनी स्वागत केले. श्रीपूर येथे श्री पांडुरंग साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्ष सुधाकर परिचारक, उपाध्यक्ष वसंत देशमुख, माजी अध्यक्ष दिनकर मोरे, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी स्वागत केले. कारखान्याच्या वतीने फळे व शिधावाटप करण्यात आले. ब्रिमासागर डिस्टिलरीच्या वतीनेही स्वागत झाले. मुक्कामासाठी पालखी बोरगावच्या बाजारतळावर विसावली.
मुस्लिम बांधवांचे अन्नदान
महाळुंग येथील मौला पठाण गेली नऊ वर्षे या पालखीतील वारकऱ्यांना अन्नदान करतात. यंदा दहाव्या वर्षीही त्यांची ही परंपरा कायम राहिली. सोमवारी त्यांनी सुमारे पाच हजार वारकरी जेवू घातले. त्याशिवाय श्रीपूर येथील अल्लाबक्ष शेख यांनीही वारकऱ्यांना आरओचे शुद्ध आणि थंड पाणी दिवसभर पुरवले. शेख अन्नदानही करतात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, माउलींच्या रिंगणामध्ये आभाळमायेचेही दर्शन
बातम्या आणखी आहेत...