आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपामुळे प्रवासी ऐन दिवाळीत वेठीस; मालवाहतूक, खासगी वाहनांचा आधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद परंडा - राज्यपरिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा गुरुवारी (दि.१९) तिसरा दिवस होता. या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरी भागात खासगी बस तर ग्रामीण भागात मालवाहतुकीची वाहनेच प्रवाशांचा आधार बनली आहे. दरम्यान, अनेक पक्ष, संघटनांकडून या संपाला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे तोडगा निघणार कधी, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. 
 
आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेऊन दि.१७ ऑक्टोबरपासून संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो बसची चाके रुतली असून सर्वच बसस्थानके प्रवाशांअभावी ओस पडली आहेत. ऐन दिवाळीच्या सणात पुकारण्यात आलेल्या या संपाचा सर्वसामान्यांना प्रचंड फटका बसत असून या संपाचा फायदा करून घेत खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकीट दरामध्ये दुपटीने वाढ करून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याचे दिसत आहे. परंतु, प्रवासीही नाईलाज म्हणून अव्वाच्या सव्वा रुपयांचे तिकीट घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. एकीकडे दिवाळीचा सिझन साधण्यासाठी एसटी महामंडळाकडून जादा बसची सोय करून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवले जाते. परंतु, ही सर्व गणित कोलमडली असून विविध कारणास्तव गावापासून दूर असलेल्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांना दिवाळी सणानिमित्त घरीही जाता आलेले नाही. तसेच राज्यभरात शेकडो एसटीचे कर्मचारीही संपामुळे विविध बसडेपोमध्ये अडकले आहेत. 
 
खासगी वाहनांचा आधार : दरम्यान,ग्रामीण भागामध्ये तर एसटी अभावी दळणवळणाची चाकेच रुतली आहेत. गावात येणाऱ्या एखाद्या खासगी वाहनधारकांकडे विनवण्या करून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. कोणी दुधाची वाहने, मालवाहतुक वाहने, दुचाकी अशा मिळेल त्या वाहनाने प्रवास करून इच्छित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत ग्रामीण भागाला सध्या खासगी वाहनांचाच आधार असल्याचे दिसून येते.

 उमरगा आगाराला ३३ लाखांचा फटका : एसटीकर्मचाऱ्यांच्या संपामुळे तीन दिवसांमध्ये एसटीच्या उमरगा आगाराला ३३ लाख रुपयांचा फटका बसला आहे. बसस्थानकात शुकशुकाट तर खासगी वाहतुकदारांची मात्र या संपामुळे दिवाळी सुरू आहे. उमरगा आगारातील ७४ बसपैकी ५६ बस आगारात तर १८ बस अन्य ठिकाणी थांबून आहेत. येथील १६० चालक, दिडशेच्यावर वाहक बावीस प्रशासन तर ४३ यांत्रिक विभागातील महिला, पुरुष कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे तालुका लांब पल्ल्याच्या १५८ फेऱ्यातून अठरा हजार प्रवाशांचा प्रवास बसअभावी बंद झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, मनसे आदींनीही संपाला पाठींबा दिला आहे. 

उस्मानाबाद येथील आगारामध्ये संपामुळे बाहेरगावातील अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांसह बसस्थानकावरील प्रवाशांसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून जेवणाची सोय करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक कर्मचारी दररोज आर्थिक योगदान देत असून यामुळे बाहेरगावच्या कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची पोटापाण्याची सोय झाली आहे. 

खासगी बस हाऊसफुल्ल, तिकिटात वाढ 
दिवाळी सणानिमित्त खासगी बसमालकांकडून अतिरीक्त बसची सोय व्यवस्था करण्यासोबतच प्रवाशांना सुिवधा देण्याबरोबरच स्वत:चाही फायदा घेण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी वाहनधारकांना आयतीच संधी मिळाली आहे. तिकीट दरात वाढ करून रात्रंदिवस बसेस चालविण्यात येत आहेत. प्रमुख मार्गावर तर रात्रंदिवस खासगी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. 
 
संपाबरोबर विरंगुळाही 
एकीकडे संपामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील बसस्थानकांवर शुकशुकाट निर्माण झाला आहे. परंतु, संपकरी एसटीचे बहुतांश कर्मचारी दिवसभर आगारात बसून आहेत. उस्मानाबादेत यातीलच काही हौशी कर्मचाऱ्यांनी बसून राहण्याऐवजी फावल्या वेळेत बॅट, चेंडू घेऊन बसस्थानकाला क्रिकेटचे मैदान बनवत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 
 
विविध पक्ष-संघटनांचा पाठिंबा 
एसटीकर्मचाऱ्यांच्या या संपाला विविध राजकीय पक्षांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. परंड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला. त्यांच्या वतीने दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुदीप मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीना पाटील, सुरेश पाटील, रोहीदास मारकड, अविनाश इटकर, शाबिर शेख, किशोर गायकवाड, शिवाजी शिवनकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...