आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य केंद्रात उपचारांपेक्षा रुग्णांची हेळसांडच अधिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामीण भागात आरोग्य सुविधांसाठी जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे चालविण्यात येतात. पण नागरिकांना चांगल्या उपचारांपेक्षा त्यांची हेळसांड होते. उपचार करण्याऐवजी थेट सोलापूरला पाठविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांची डोळेझाक यास कारणीभूत ठरली असून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण नातेवाईकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याऐवजी साहित्य खरेदीवर अधिकाऱ्यांचा भर आहे. चादर, बेडसीटसह इतर काही आवश्यक गोष्टींची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. पण, त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह आहे. केवळ खरेदीचा सोपस्कार करून टक्केवारीवर भर असतो. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी टेबल ऑपरेशन थिटएरमधील काही गोष्टींची खरेदी केली आहे. पण, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अगोदरच्या वस्तू सुस्थितीत असताना पुन्हा नव्याने खरेदीचा अट्टाहास का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही आरोग्य केंद्रांमध्ये नव्याने खरेदी झालेलल्या वस्तूंचे ढीग आहेत. याबाबत बोलताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी म्हणाल्या,“मी स्वत: डॉक्टर आहे, खरेदी पडताळावी लागेल.”

आशाना ताण, मोबदला अनियमित
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत साथरोग नियंत्रण, गृहभेटीद्वारे आरोग्य तपासणी, कुपोषण निर्मुलन लसीकरण ही प्रमुख जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांची असते. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आशा स्वयंसेविकांवर सर्व कामं सोपविण्याचे सर्रास प्रकार सुरू आहेत. जिल्ह्यात २५०० आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत.

१७ आरोग्य केंद्रांना आयएचएस दर्जा
ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दर महिन्याला सरासरी दहा बाळंतपण होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आयएचएस (इंडियन हेल्थ स्टॅण्डर्ड) मानांकन मिळतो. जिल्ह्यात एकूण ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून सन २०१५-१६ मध्ये फक्त १७ आरोग्य केंद्रांना तो दर्जा आहे. सन २०१४-१५ मध्ये २१ आरोग्य केंद्रांना दर्जा होता.

वाहन कंत्राटाची चौकशी सुरू
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गेत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्षास कंत्राटी वाहन खरेदीचा मक्त महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या मर्जीतल्या ठेकेदारास देऊन त्यास दोन लाख ३९ हजार ६२२ रुपयांचे बिलं देण्यात आली. त्याचा ठेका रद्द केला असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आेपीडीत शुकशुकाट, खासगी दवाखाने तेजीत
प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. आरोग्य केंद्रातील असुविधा, डॉक्टरांची अनियमितता, आैषधांचा तुटवडा अशा गोष्टींचा अनुभव आल्याने शासकीय रुग्णालयांबाबत मानसिकता बदलत असून खासगी दवाखाने तेजीत सुरू आहेत.

प्राथमिक सुविधांचा अभाव..
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता, पाणी पुरेशी आैषधं या प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून दोन किलोमीटर दूर माळरानावर आहे. तेथे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना स्वत: सोबत पाणी आणावे लागते. खाटांची दूरवस्था झाली असून गादी, बेडसीट अन्् चादरींचा अभाव आहे. आरोग्य केंद्रात क्वचितप्रसंगी बाळंतपणं होतात. बाळ बाळंतीणीस आंघोळीसाठी पाणी नसल्यामुळे नातेवाईक बाळंतणीस लगेच घरी घेऊन जातात. अशीच स्थिती इतर अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहे.

चौकशीची गरज
^प्राथमिकआरोग्यकेंद्रांमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह आहे. बदलत्या काळानुसार आरोग्य केंद्र ही संकल्पनाही बदलावी. ग्रामीण भागात अद्ययावत खासगी रुग्णालये सुरू आहेत. त्याच पद्धतीचे उपचार शासकीय रुग्णालयांमध्येही व्हावेत. चौकशीची गरज आहे. शिवाजीकांबळे, सदस्य, आरोग्य समिती

वापराअभावी साहित्य
^आरोग्यकेंद्रांकडूनआलेल्या मागणीनुसार खरेदी केली आहे. वापरा अभावी साहित्य पडून असलेल्या साहित्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिलेत. गरज असलेल्या ठिकठिकाणी त्या साहित्यांचा पुरवठा होईल. आैषधं इतर साहित्य शासनस्तरावरून येतात. मकरंदनिंबाळकर, सभापती, आरोग्य समिती जिल्हा परिषद

एक्सरे मशीन दिल्या ग्रामीण रुग्णालयांना
जिल्हा परिषदेच्या पाच वर्षांपूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १५ एक्सरे मशीनची खरेदी केली. पण, त्यासाठी तंत्रज्ञ डेव्हलपिंगसाठीचा खर्च आदींसह इतर प्राथमिक सोयी-सुविधांचा अभावामुळे त्या एक्सरे मशीन धूळखात पडून होत्या. त्यामुळे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी त्या सर्व एक्सरे मशीन ग्रामीण रुग्णालयांना हस्तांतरित करण्याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करून हस्तांतरीत केल्या. अन्यथा, त्या मशीन भंगारमध्ये काढून त्यांचीही विक्री झाली असती. क्षमता अडचणींचा अभ्यास करताच साहित्य खरेदीचा जोर असतो.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून साहित्यांची मागणी झाली आहे. त्यानुसार ऑपरेशन टेबल, ट्रॉली डिलिव्हरी टेबल खरेदी केलेत. सुमारे ४२ लाख रुपयांची साहित्य खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ई-टेंडरिंग पद्धतीने केली असून दर्जेदार साहित्य आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही आरोग्य केंद्रात साहित्य पडून नाहीत. असल्यास त्वरित गरजेच्या ठिकाणी पाठविण्यात येतील. आरोग्य केंद्रांच्या आेपीडी कमी होण्याची कारणं शोधून त्यावर पर्यायाचा शोध सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९ पदं रिक्त असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कुठेही आैषधांचा तुटवडा नसून मुदतबाह्य आैषधे नाहीत. लागणाऱ्या आैषधांची मागणीच करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. पाण्यासह इतर प्राथमिक सोयी-सुविधांची कामं लवकरच होतील. उपचारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.

पत्र्याच्या खोलीत आैषधांचा साठा
शहरामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका पत्र्याच्या खोलीत प्राथमिक आरोग्य केंद्रांची आैषधं ठेवण्यात येतात. उन्हाळा त्याची काय स्थिती झाली असेल? याकडे पाहण्याची तसदी घेण्याऐवजी नवीन आैषधं खरेदीचा प्रस्ताव तयार करणे अन् सोईस्कर ठिकाणाहून खरेदी यावरच प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.

वडकबाळ उपकेंद्रात मुदतबाह्य आैषध
विजापूर- सोलापूर राष्ट्रीय महार्गावरील वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे आरोग्य विभागाचे उपकेंद्र आहे. पण, त्याची दयनीय अवस्था असून उपकेंद्र असल्याचा फलक लावण्याची तसदी आरोग्य विभागाने घेतली नाही. निमयित कर्मचारी नसल्याने त्या परिसरातील रुग्णांची गैरसोय होते. नागरिकांच्या तक्रारीवरून तेथील आरोग्य सेविकाला गेल्या महिन्यात निलंबित केले. दरम्यान, चौकशीसाठी नेमलेल्या पथकास त्या उपकेंद्रात मुदतबाह्य आैषधं आढळली. शहरालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ही अवस्था असून इतर ठिकाणची स्थिती अधिक भयावह आहे. मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यावरही दुर्लक्ष केले जात आहे. सर्वसामान्य रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वेळीच लक्ष देण्याची गरज आहे
बातम्या आणखी आहेत...