आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वकल्पना न देता ब्लास्टिंग, घरावर दगड पडून 5 जखमी; रहिवासी रस्त्यावर उतरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - उस्मानाबाद सोलापूर बाह्यवळण रस्त्यावर रस्ता चौपदरीकरणासाठी केलेल्या ब्लास्टिंगच्या स्फोटात डोंगरकडा कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला तर रस्त्याच्या वरच्या बाजूला डोंगरावरील वस्तीवरच्या रहिवाशांना कल्पना दिल्याने स्फोटानंतर दगड पडून अनेक घरांचे नुकसान झाले. तसेच पाच जण जखमी झाले. या घटनेनंतर वस्तीतील प्रक्षुब्ध नागरिकांनी रस्ता रोखून कामावरील वाहनांचे नुकसान केले. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. 
 
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू आहे. शहराजवळून जाणाऱ्या बाह्य़वळण रस्त्यावर रुंदीकरणासाठी डोंगर फोडण्यात येत आहे. यासाठी गुरुवारी (दि.१४) दुपारी अडीचच्या सुमारास ब्लास्टिंग करण्यात आले. यामध्ये डोंगराचा मोठा भाग कोसळून रस्त्यावर दगडाचा खच पडल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला होता. सर्व वाहतूक शहरातून जुन्या मार्गाने वळविण्यात आली. ब्लास्टिंगसाठी करण्यात आलेल्या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने संपूर्ण शहर भूकंपासारखे हादरले तसेच गुढ आवाज झाला. यामूळे नागरिकांत भूकंपाची चर्चा पसरली लागलीच व्हाट्सअप, फेसबुकवर व्हायरल झाली. तर अनेकांना १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपाची आठवण झाली. 
 
माहिती घेऊन कार्यवाही करू 
रस्ता चौपदरी करणाच्या कामासाठी ब्लास्टिंग केल्याने लगतच्या मातंग नगर, डक्कलवार वस्तीत डगड लागून नागरिक जखमी झाल्याचे तसेच घरांचे नुकसान झाल्याचे निवेदन प्राप्त झाले आहे. या संदर्भात माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल. 
- दिनेश झांपले, तहसीलदार. 
 
नुकसान भरपाई द्या 
दुपारी जेवण करून घरासमोर झोपलो असताना अचानक जोराचा आवाज झाला, जमीन हादरली दगड येऊन डोक्यात लागून जखम झाली. कोणतीही पूर्वसूचना देता विनापरवाना ब्लास्टिंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. 
- संग्राम जाधव, जखमी मातंगनगर. 
 
दगडामुळे पत्र्याला छिद्रे 
मातंगनगर, डक्कलवार वस्तीतील शंभरावर घरावर ब्लास्टिंनंतर दगड पडल्याने जण जखमी झाले. अनेक घरांना तडे गेले दगड पडून पत्र्याला छिद्रे पडली. यात संग्राम जाधव, नाथा सूर्यवंशी, आकाश शिंदे, महादेवी क्षीरसागर, छाया लोंढे जखमी झाले. 
 
रहिवाशांचे तहसीलदारांना निवेदन 
मातंग नगर, डक्कलवार वस्ती येथील नागरिकांनी महामार्गावर उतरून रुंदीकरणाच्या कामावरील वाहनांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान करून रोष व्यक्त केला. यानंतर नागरिकांनी नायब तहसीलदार अमित भारती यांना निवेदन दिले. निवेदनावर नगरसेवक किशोर साठे , शालू गायकवाड, छाया लोंढे, संध्या खंडागळे आदींच्या स्वाक्षरी आहेत. 
 
ब्लास्टिंगमुळे तलावास धोका 
रस्ता चौपदरीकरणासाठी रामदरा तलावाच्या भरावानजीक मोठ्या तीव्रतेचे ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने तलावाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यामुळेच उजनीचे मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी येण्यापूर्वीच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...