आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव श्वानांच्या प्रदर्शनामध्ये ३२ जाती मिरवल्या रॅम्पवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुळे सोलापुरातील जामगुंडी लॉन्स येथे रविवारी पाळीव कुत्र्यांची पावले रॅम्पवर थिरकली. वेगवेगळी आकर्षक वेशभूषा केलेले, त्यांची चाल, उभारण्याची पद्धत, शरीराची ठेवण प्रमाणबद्ध यावर शिक्कमोर्तब होताच एकच जल्लोष झाला. निमित्त होते केनल असोसिएशनच्या डॉग शोचे. 

आपल्या कुत्र्यास चॅम्पियन बनवण्यासाठी मालकांची धडपड दिसली. सोलापूरसह, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा हैदराबाद येथून देशी विदेशी श्वान घेऊन २२५ मालकांनी ३२ वेगवेगळ्या प्रजातीआणल्या होत्या. यात लॅब्रेडॉर, डॉबरमन, बूशमार्शल, ब्लॅक कलरचे पग, तिबेटियन लासा अॅप्सो, इंग्लिश कॉकर, स्पॅनिअल, शीजू, जर्मन शेफर्ड, ग्रेट डॅम, कारवान, हौन, अकिता, गोल्डन रिटरिव्हर, इंग्लिश मॅस्टिफ, रॉटवॉयलर, मीनटीन, टोमिरीयन, इंडियन डॉग, क्रॉसबीट आदींचा समावेश होता. 

हवाई सुंदरी, इंजिनिअर, स्वीमर, नेता, डॉक्टर अशा विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या. १२ ते १४ वयोगटातील युवक-युवतींसाठी ज्युनिअर हॅण्डलर स्पर्धा याप्रसंगी घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र साळवी (बडोदा), के. के. त्रिवेदी (लखनऊ), सी. ए. मार्टीन्स (गोवा) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. 

याप्रसंगी पुणे येथील गौरी नारगोळीकर, प्रसन्न भिडे, निशिकंत कोटा, स्टिव्ह अलमेडा, अक्षय अबनावे, सोलापुरातील संयोजक महेश दळवी, मनीष अवस्थी, अनिल अवदाळ, अभिषेक वसगडेकर आदी उपस्थित होते. 

युक्रेनी रॉर्कशायर 
लांब अन्् झुपकेदार केसांनी झाकलेली रॉर्कशायर जातीची केवीन सहभागी होती. पुणे येथील प्रवीण वडके यांनी युक्रेन येथून ती मागवली असून लांबसडक अन्् झुबकेदार केस अन्् चपळता हे तिचे वैशिष्ट्य. केवीनचे वेणी घालून त्यास छान हेअरपीन रबर लावण्यात आले होते. 
हैदराबादेतील बांधकाम व्यावसायिक रमेशकुमार छाब्रा यांचा बोन्जो तब्बल १०० किलो वजनाचा होता. इंग्लिश मॅस्टिफ जातीचा बोन्जो तीन वर्षांचा आहे. त्यास दररोज एक किलो चिकन, एक किलो बीफ खीमा, दीड किलो रॉयलकॅनल लागते. त्याचा महिन्याचा खर्च ३० हजार रुपये आहे. तो दोन वेळचा चॅम्पियन आहे. छाब्रा यांच्याकडे मॅस्टिप जातीचे एकूण पाच श्वान अाहेत. 

अशी होते परीक्षा 
‘केनल क्लब ऑफ इंडिया’ (केसीआय) या संस्थेतर्फे देशात ‘डॉग शो’ आयोजित केले जातात. यातील ‘चॅम्पियन’ला खूप मान आहे. कुत्र्याचे आरोग्य, वाढ, त्याची निगा, स्वच्छता, आज्ञाधारकपणा, शोमधील खेळांतील कामगिरी आदी निकष आहेत. वर्षभरात विविध डॉग शोमधील मिळालेले गुण एकत्र करून ‘वार्षिक विजेता श्वान किंवा चॅम्पियन’ जाहीर केला जातो. याशिवाय ‘बेस्ट इन क्ला’ प्रजातीत सर्वोत्कृष्ट श्वान किंवा बेस्ट इन ब्रीड, काही प्रजातींच्या गटातील सर्वोत्कृष्ट ‘बेस्ट इन ग्रुप’ आणि बेस्ट इन शो अशीही प्रमाणपत्रे या श्वानांना दिली जातात. यासाठी क्लबकडून कडक नियमावलीही केली जाते. 

 
बातम्या आणखी आहेत...