आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थगिती फक्त हिमालयाला; इतरांवर कारवाई होणारच, विभागीय आयुक्त डॉ. तिरपुडे यांचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुंबईच्या आैद्योगिक लवादाने दिलेली सत्यराम म्याकल यांच्या हिमालया टेक्स्टाइलची स्थगिती अन्य कारखान्यांना लागू होत नसल्याचे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय अायुक्त डाॅ. हेमंत तिरपुडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंत्रमाग धारकांनी संप चालूच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला अाहे. दरम्यान, उपराष्ट्रपती येणार असल्याने २५ अाॅक्टोबरपर्यंत कारवाई करणार नसून त्यानंतर कारवाई होईल, असे पीएफ कार्यालयाने स्पष्ट केले अाहे. 
 
यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बंदचा बुधवारी तेरावा दिवस होता. दिवाळीच्या तोंडावर संप मागे घेण्याचे ठरलेच होते. म्याकल यांच्या हिमालया टेक्स्टाइलला स्थगिती मिळाली होती. दरम्यान, डॉ. तिरपुडे यांनी इतरांवरील कारवाई बाबत ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे कारखानदारांचा बंद कायम राहिला आहे. 
 
डॉ. तिरपुडे म्हणाले, मुंबईच्या आैद्योगिक लवादाने दिलेली स्थगिती ही फक्त म्याकल यांच्या हिमालया टेक्स्टाईल्सलाच लागू होते, इतर यंत्रमाग कारखान्याना नाही. मुंबईच्या आैद्योगिक लवादाच्या पुढे म्याकल यांच्या १७-१८ युनिटचे क्लबिंग करून EPF कायदा लागू केला गेला. म्याकल हे मुंबईच्या औद्योगिक लवादासमोर संपूर्ण यंत्रमाग उद्योगाचे प्रतिनिधीत्व करत नसून त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक यूनिट्सचे मालक म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. यंत्रमाग धारक संघ हा अपीलमध्ये गेला नाही, त्यामुळे इतर कारखान्याचा विषय मुंबईच्या आैद्योगिक लवादा समोर नाही. आता अपील करण्याची मुदतही संपलेली आहे. 
 
इतर कारखान्यांवर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. फक्त नोटीस देण्यात आलेल्या आहेत. नोटीस देणे ही सुरुवात असते, त्यामुळे स्थगितीचा प्रश्नच निर्माण होत नाही. मुंबईच्या आैद्योगिक लवादाचा अंतिम निर्णय येईपर्यंत म्याकल यांच्या हिमालया टेक्स्टाइल्सच्या विरोधात कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही, असे तिरपुढे म्हणाले. 
 
कारवाई रोखली जाणे होते आवश्यक 
खरेपाहता हिमालयाच्या धर्तीवर सर्वांना नोटिसा बजवण्यात आल्या. पुढील कारवाईला औद्योगिक लवादाने स्थगिती दिली तिथेच ही कारवाई रोखली जाणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. डॉ. तिरपुडे यांनी अभिप्राय कळवल्यामुळे कारखाने बंदचा निर्णय कायम आहे. 
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ 
बातम्या आणखी आहेत...