सोलापूर- जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या २५ जानेवारीला सकाळी अकराला होणार आहे. ही बैठक घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दोन वेळा पत्र दिले होते. तरीही त्यांच्याकडून तारीख ठरली नाही. महिनाअखेरपर्यंत बैठक घेणे अनिवार्य असल्याने जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी थेट श्री. देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर तारीख निश्चित झाली.
ग्रामपंचायत निवडणूक विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बैठक होऊ शकली नव्हती. यानंतर जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांना वेळ मिळण्यासाठी पत्र दिले. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुंढे देशमुख यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद निर्माण झाला आहे. याचा प्रत्यय अनेक घटनांतून शहर जिल्हावासीयांना पाहण्यास मिळाला. मात्र या वादाचा फटका जिल्ह्यातील विकासकामे पुढील वर्षीचे नियोजन यावर झाला आहे. पुनर्नियोजन आणि २०१६-१७ या पुढील वर्षाचे नियोजन करून शासनाला अहवाल देण्यासाठी बैठक होणे आवश्यक होते.
मुंढेंच्या बदलीनंतरच बैठकीचा निर्धार
श्री. देशमुख यांनी यापूर्वी अनेक वेळा जाहीर वक्तव्ये केली आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतरच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले होते. आमदार प्रशांत परिचारक यांचा उमेदवारी अर्ज भरणे आणि विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असतानाही देशमुख यांनी जिल्हाधिकारी मुंढे यांच्या कक्षात जाण्याचे टाळून बाहेरच थांबणे पसंत केले होते.
पालकमंत्री यांच्याशी बोलणे झाले
जिल्हानियोजनसमितीची बैठक घेण्यासाठी समितीचे अध्यक्ष पालकमंत्री देशमुख यांना यापूर्वी दोन वेळा पत्र दिले होते. बैठक घेण्यासंबंधी आज (सोमवारी) त्यांच्याशी फोनवर संवाद साधला, त्यांनी बैठक घेण्यासाठी २५ जानेवारीची वेळ दिली आहे.” तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी