आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरा दिन विशेष: वृक्ष लावा, शहर होईल थंडगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहर गेल्या अनेक वर्षांपासून तापमानाच्या नोंदीत राज्यात अग्रेसर राहत आहे. शहरात वाढते कॉँक्रिटीकरण पाहता, यासाठी होणारी वृक्षतोड शहराचे तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ऋतुचक्राप्रमाणे असणारा चार महिन्यांचा उन्हाळा सोलापूरकरांना किमान सहा ते साडेसहा महिन्यांचा जाणवतो. शहराच्या वाढत्या तापमानाला वृक्षांची कमतरता हेच एक मुख्य कारण दिसत आहे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ‘दिव्य मराठी’ने शहर परिसरात केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या प्रमुख गोष्टी...

शहराचा विचार केला तर अनेकविध कारणांनी सोलापूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. तापमान असेच वाढत गेले तर भविष्यात शहर विकसित होण्याऐवजी विस्थापित होऊ शकते. सोलापूर शहरावर ही परिस्थिती निर्माण होण्याआधीच वृक्ष लागवड आणि जलस्तर वाढविण्यावर भर दिला तर तापमान काही प्रमाणात घसरण्यास निश्चितच मदत होईल. त्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात ‘हरित सोलापूर’ या ध्येयाने वृक्षलागवड संवर्धनाची चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या सातरस्ता परिसरात पूर्वी अनेक झाडी होती. पण, रस्ते रुंदीकरणात त्यावर कुऱ्हाड चालली. सातररस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौक या रस्त्याच्या दुतर्फा ८० छोटी-मोठी झाडं आहेत. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत झाडांचे प्रमाण कमी असून दुतर्फा ४० पेक्षा कमी छोटी-मोठी झाडं आहेत. चार हुतात्मा पुतळा ते शिवाजी चौक मार्गावर अवघी २० झाडं आहेत. रेल्वे स्टेशन ते सातरस्ता मार्गावर ३७ झाडं आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात ही परिस्थिती आहे. रंगभवन ते अशोक चौक या मार्गावर आठ ते दहा जुनी कडुनिंबाची झाडं वगळता छोटी-मोठी झुडपंही नाहीत, हे वास्तव आहे. लकी चौक ते हि. ने. वाचनालय समोरील रस्ता परिसरात हा भाग झाडांनी व्यापलेला आहे.
कोण घेऊ शकतो पुढाकार
शहराच्यातापमानाची समस्या सोडवण्यासाठी शहरातील लायन्स, रोटरी क्लब, सीए असोसिएशन, क्रीडा संघटना, सामाजिक, राजकीय संघटना, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, खासगी कंपन्या, याशिवाय प्रत्येक जागरुक नागरिक आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतात. आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, राष्ट्रीय नेते, राजकीय पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला एक वृक्ष लावण्याची जबाबदारी कर्तव्य म्हणून स्वीकारून शहरातील वृक्षांची संख्या वाढवता येईल.
हे आहे वृक्षांचे कार्य :
*प्राणवायू(आॅक्सिजन)चीनिर्मिती करतात.
*हवेचेप्रदूषण थांबवतात *जमिनीचीफलद्रुपता आणि हवेत आर्द्रता टिकवणे
*पशू-पक्ष्यांचेआश्रयस्थान *प्रथिनांत(प्रोटिनमध्ये) रुपांतर करणे

नागरिक काय म्हणतात...
झाडांमुळे प्रदूषणाचीतीव्रता कमी होण्यास मदत होते. सध्याची उन्हाची तीव्रता पाहता उष्णतेच्या बेटाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे जाणवते. वेळीच त्याबाबत जागरुक झाल्यास भविष्यकाळ कठीण आहे. दुसऱ्यांसाठी नाही तर स्वत:साठी अन् कुटुंबासाठी किमान एक झाडं लावण्याची मोहीम आता गतिमान करावी लागेल. डॉ. राजा ढेपे, वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक
सोलापूर शहर परिसर हिरवाईने समृद्ध व्हावा या अपेक्षेने आम्ही गेल्या दोन वर्षांपासून झाडं भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तुळशीच्या रोपट्यापासून सुरवात केली असून आापर्यंत एक हजारपेक्षा जास्त रोपांचे वाटप केले. स्थानिक प्रजातींची आैषधं रोपं आम्ही भेट देऊन ती लावण्यासाठी आग्रह करतोय. विवेक लिंगराज, प्रदेशसचिव, झेडपी कर्मचारी युनियन.
उन्हाची तीव्रतासहन होत नसल्यामुळे दिवसभर घरात किंवा कार्यालयील कृत्रिम गारव्यात किती दिवस बसणार. वेळीच त्याबाबत पुढाकार घेतल्यास भविष्यकाळात आणखी समस्या वाढणार आहे. उन्हाळ्यातील चटका लक्षात ठेवून पावसाळ्यात किमान दोन झाडं आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत लावलीच पाहिजेत. संजय भोईटे, वृक्षमित्र