आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेकीच्या अफवेमुळे उस्मानाबादेत पाणीदार रेल्वेला पोलिस संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- मिरजहून लातूरकडे पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वेला उस्मानाबाद स्थानकावर पोलिसांनी संरक्षण दिले होते. सोमवारी रात्री उशिरा उस्मानाबाद स्थानकावर आल्यानंतर रेल्वेभोवती शस्त्रधारी पोलिसांनी कडे केले होते. पाण्याच्या गाडीवर उस्मानाबादकर हल्ला करणार असल्याची अफवा पसरल्यामुळे रेल्वेला संरक्षण देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नाही.

मिरजहून सोमवारी सकाळी लातूरकडे निघालेल्या रेल्वेवर उस्मानाबाद रेल्वेस्थानकावर तहानलेल्या उस्मानाबादकरांकडून दगडफेक करण्यात येणार असल्याची माहिती उस्मानाबाद पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे स्थानकावर थांबल्यानंतर रेल्वेला पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मिरजहून लातूरकडे पाणी घेऊन जाणारी रेल्वे उस्मानाबाद स्थानकावर आली. या स्थानकावर थांबल्यानंतर पोलिसांनी रेल्वेला चोहोकडून बंदोबस्त लावला. सुमारे १२ वाजेपर्यंत रेल्वे स्थानकावर थांबून होती. दीड तासाच्या कालावधीत पोलिस रेल्वेला पहारा देत होते. मात्र, रेल्वेस्थानकाकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे दगडफेकीची निव्वळ अफवा होती, हे नंतर स्पष्ट झाले. या अफवेमुळे पोलिसांची दमछाक झाली.
मिरजहून लातूरकडे पाणी घेऊन जाणारी रेल्वे सोमवारी रात्री उस्मानाबाद स्थानकावर दीड तास थांबविण्यात आली होती. या रेल्वेला शस्त्रधारी पोलिसांचे संरक्षण होते.