आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांना करमुक्त घर देण्याचे धोरण राबवणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घाेषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापुरातील मीनाक्षी पसूल या कामगाराच्या घरी मुख्यमंत्री  व केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी जेवण  घेतले. शेजारी उभे माजी आमदार नरसय्या आडम. - Divya Marathi
साेलापुरातील मीनाक्षी पसूल या कामगाराच्या घरी मुख्यमंत्री व केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी जेवण घेतले. शेजारी उभे माजी आमदार नरसय्या आडम.
सोलापूर - गरिबांना करमुक्त घर देण्याचे धोरण राज्यभर राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ‘२०२२ पर्यंत सर्वांना घर’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्य सरकारची वाटचाल त्याच पद्धतीने सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून ५१०० घरे बांधण्याचा प्रकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हाती घेतला. त्याच्या पहिल्या टप्प्यातील १६०० घरांचा हस्तांतरण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते झाला, या वेळी ते बोलत होते. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माकपच्या पश्चिम बंगालचे खासदार तपन सेन, सोलापूरचे खासदार अॅड. शरद बनसोडे आदी मंचावर होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘गरिबाला घर देताना प्रसंगी कायदाही मोडायला हरकत नाही. कारण शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन झाले तरच शहरे खऱ्या अर्थाने स्मार्ट होतील. गरिबाच्या घराचे बजेट कमीत कमी झाले पाहिजे. त्यासाठी अकृषिक सारासारखे कर पूर्णपणे माफ करण्याचे धाेरण लवकरच घेण्यात येईल. त्यांच्या वसाहतींना मूलभूत सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.’

कामगाराच्या घरी जेवण
मुख्यमंत्र्यांचा साेलापुरात केवळ दीड तासांचा दाैरा हाेता. घरकुल हस्तांतरण कार्यक्रम दीड वाजता संपला. त्यानंतर त्यांनी एका विडी कामगाराच्या घरी जेवण घेतले. मीनाक्षी पसूल या कामगार महिलेने पुरणपोळ्या, भाकरी, आमटी, वांग्याचे भरीत आदी पदार्थ बनवून ठेवले होते. परंतु फडणवीस यांनी फक्त दोन भाकऱ्या, वांगी, दही आणि भात घेतला. त्यानंतर माध्यमांंना दूर सारत त्यांचा ताफा विमानतळाकडे रवाना झाला.

५० कॉटचे रुग्णालय
केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी या कामगार वसाहतीसाठी ५० कॉटचे प्रसूतिगृह देण्याची घोषणा केली. त्यांचा धागा धरून फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना महिनाभरात जागेची निश्चित करण्याची सूचना केली. संस्थेचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी जागा मोफत देण्याचे जाहीर केले. त्यामुळे कामगारांच्या या वसाहतीत आता ५० कॉटचे प्रसूतिगृह होईल.