आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक नेत्यांची राजकारणात एन्ट्री, वेगवेगळ्या सामाजिक कार्यातून पाडली छाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - पुण्यातील शिक्षणसम्राट प्रा. तानाजी सावंत परंड्यातल्या शिवजलक्रांतीमुळे शिवसेनेचे उपनेते बनले. मुंबईतील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक शंकर बोरकर इंदापूरमधील साखर कारखान्याच्या माध्यमातून चर्चेत आले आणि आता जिल्हा परिषदेतून नशिब अजमावणार आहेत. मुंबईतील उद्योजक अशोक जगदाळे ऐन दुष्काळात नळदुर्गकरांची सोय करून सक्रिय राजकारणात उतरले आणि भगिनीला नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळवून दिला. सोलापूरला स्थिरावलेले सुभाष देशमुख, वाशीतील प्रतापसिंह पाटील अशी जिल्ह्यातील मंडळी बाहेर जाऊन यशस्वी उद्योजक बनल्यानंतर त्यांनी आता गावाकडच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे.

पैसा, संपत्ती असला की ऐश्वर्य, सामाजिक प्रतिष्ठा लाभते, अशी वदंता आहे. मात्र, हे काही प्रमाणात सत्य असले तरी केवळ पैशातून प्रतिष्ठा मिळत नाही, असा अनेकांचा समज आहे. तर या पैशातून सामाजिक कार्ये करण्याची अनेकांची मनिषा आहे. दुसरीकडे सामाजिक प्रतिष्ठा शोधण्यासाठी राजकारणातून पदे मिळविण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे. त्यासाठी वाटेल ती रक्कम मोजण्याची तयारी आहे. जिल्ह्यात अलिकडच्या काळात बदलत असलेल्या राजकारणावरून हेच अधोरेखित होत आहे. मोठ्या शहरात स्वत:च्या क्षमता विकसित करून, उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती मिळविणाऱ्यांना राजकारणातून पद मिळवून सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची आहे. जिल्ह्यातील सुभाष देशमुख, प्रा.तानाजी सावंत, शंकर बोरकर, अशोक जगदाळे, देवदत्त मोरे, गोविंद पवार, अशा अनेकांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग नाव केले. अगदी परिस्थिती बेताची असूनही जिद्द, परिश्रम, चिकाटी आणि कौशल्यावर यशस्वी उद्योजक, व्यवसायिक झालेल्या जिल्ह्याच्या या भूमीपुत्रांनी मुंबई, पुणे,सोलापूर, अशा शहरात स्वत:ची क्षमता सिध्द केली. त्यातून पैसा मिळविला. या पैशातून सामाजिक कार्याची वाट धरताना काहींनी पूर्वीच राजकारणाचा मार्ग शोधला तर काहींनी या मार्गावरून आपली वाटचाल सुरू केली आहे. सुभाष देशमुख मूळचे पोहनेरचे. उस्मानाबादजवळच्या या खेड्यात त्यांचे बालपण गेले. त्यांचा परिवार छोट्याशा उद्योगाच्या माध्यमातून सोलापूरला स्थिरावला आणि त्यांनी लोकमंगलसारख्या उद्योगातून प्रचंड भरारी घेतली. त्यांनी सोलापूरमध्येच राजकारणात यश मिळविले; मात्र,त्यांचे सुपूत्र रोहण देशमुख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यांनी गेल्या लोकसभेला जिल्ह्यात नशिब अजमावले. त्यांचे जिल्ह्यात लोकमंगल उद्योग समुहाच्या माध्यमातून नेटवर्क आहे. प्रा.तानाजी सावंत मूळचे माढा तालुक्यातील वाकाव येथील रहिवाशी असले तरी उस्मानाबादमधल्या परंड्यातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. नातेवाईक असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मदतीने प्रा.सावंतांनी परंड्यात साखर कारखाना सुरू केला. प्रा.सावंत यांनी जलयुक्त शिवारची अभूतपूर्व कामे केली आणि प्रभावी कामाने त्यांना शिवसेनेने थेट उपनेतेपद बहाल केले. वास्तविक, ५० कोटींची कामे स्वखर्चाने केलेल्या सावंत यांना भूम-परंडा-वाशी तालुक्यातील विधानसभेची तयारी करायची होती. मात्र, पक्षाने त्यांना आधीच यवतमाळमधून विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. कसबे तडवळ्यातील देवदत्त मोरे १५ वर्षापूर्वी पुण्यात स्थायिक झाले.उद्योगातून मोठी संपत्ती मिळविलेल्या मोरेंना गावाचा विकास करायचा आहे. त्यांनी गावासाठी दोन कोटीहून अधिक खर्च केले. ते राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहे. वाशीचे सुपूत्र गोविंद पवार पोलिस निरीक्षकपदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी वाशीमध्ये राष्ट्रवादीकडून राजकारणात एन्ट्री केली. मागील झेडपी निवडणुकीत त्यांनी प्रशांत चेडे यांना लढत दिली होती. त्यांचे घडामोडींवर लक्ष असते. एकीकडे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, अशी जुनी म्हण अाहे, मात्र अपवाद वगळता उस्मानाबाद जिल्ह्यातील सुपूत्रांनी बाहेर उद्योग उभारून जिल्ह्यात राज्यकर्ते बनण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शंकर बोरकरांचे ध्येय आता जिल्हा परिषद
मूळचे वाशी तालुक्यातील इंदापूरचे शंकर बोरकर नृसिंह साखर कारखान्यामुळे चर्चेत आले. मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिक असलेले बोरकर शिवसेना नेते दिवाकर रावते यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी सेनेकडून २००९ च्या निवडणुकीत भूम-परंडा-वाशी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अपयश आले असले तरी बोरकर आता जिल्हा परिषदेसाठी प्रयत्नरत आहेत. अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने बोरकर त्यासाठी पक्षाकडून दावेदार ठरले आहेत.
जगदाळेंची झेप विधानसभेकडे
नळदुर्गमधल्या मातीत वाढलेले मात्र मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले अशोक जगदाळे यांनी राष्ट्रवादीकडून नळदुर्गमध्ये पकड बसविली. त्यांच्या भगिनी नुकत्याच नगराध्यक्ष झाल्या. आता जगदाळेंचे ध्येय तुळजापूर विधानसभा आहे.
पुढे वाचा ,
प्रतिष्ठा नव्हे, विकास करायचाय
बातम्या आणखी आहेत...