आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला हटविण्यासाठी आघाडी, राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय आघाडीची मोट; संभ्रम कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- काँग्रेससह शिवसेना-भारतीय जनता पक्षाने आघाडी करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला टक्कर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीविरुद्ध सर्वपक्षीय आघाडी, असे चित्र उस्मानाबाद कृषी बाजार समितीमध्ये दिसणार आहे. मात्र असे असले तरी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून जिल्हाप्रमुखांनी संभ्रम निर्माण केला आहे. यावरून शिवसेनेत ताळमेळ नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून, आघाडी आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी १८ जागा धरल्यास ३६ जागा होतात. अन्य उमेदवार कोणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना-भाजपला निमंत्रित करून आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला काँग्रेसच्याच काही प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा स्वबळावर लढावे किंवा राष्ट्रवादीसोबत आघाडी करावी, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे काँग्रेसचा जिल्ह्यातील क्रमांक एकचा शत्रू असलेल्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची आघाडी होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, काँग्रेसने कार्यकर्त्यांची समजूत काढून शिवसेनेसह भाजपच्या बळावर आघाडी स्थापण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जवळपास चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस-शिवसेना-भाजपने जागा वाटप करून उमेदवार घोषित केले. तर राष्ट्रवादीनेही १८ जागांसाठी उमेदवार घोषित केले. यामुळे परंपरेप्रमाणे राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने स्वतंत्र पॅनल असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आघाडीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. आघाडीत समाविष्ट झाल्यानंतर समान जागा वाटप झाले होते.
त्यानुसार काँग्रेस, शिवसेना प्रत्येकी तर भाजप जागा लढवणार असे निश्चित झाले होते. एक जागा सर्वपक्षीय पुरस्कृत असेल असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याने आघाडीचे काय होणार, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. सेनेच्या वेगळ्या भ्ूमिकेमुळे मात्र पक्षामध्येच ताळमेळ नसल्याचे स्पष्ट होत असून, गटबाजीमुळे कुणी आघाडी तर कुणी स्वबळाची भाषा करीत असल्याने शिवसैनिकही संभ्रमात पडले आहेत.

तुळजापुरात सेना-भाजप राष्ट्रवादीसोबत : उस्मानाबादेतराष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना-भाजप आणि काँग्रेस एकत्र आले असले तरी तुळजापूर बाजार समितीमध्ये काँग्रेसविरुद्ध सेना-भाजप, राष्ट्रवादी एकत्र आले आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार
तानाजीगायकवाड, दत्तात्रय देशमुख, व्यंकट पाटील, बाळासाहेब घुटे, शाम जाधव, निहाल काझी, उद्धव पाटील, रोहिणी नाईकवाडी, रत्नमाला शिनगारे, अरुण वीर, बबिता माने, गोपाळ आदटराव, दयानंद भोयटे, जीवन हिप्परकर, युवराज शिंदे, नारायण यलकर, संतोष हवडे, ज्ञानदेव पवार.

सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार
काँग्रेस-शिवसेना- भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलने जाहीर केलेले उमेदवार- भारत गुंड, अमोल पाटील, अविनाश चव्हाण, धोंडिराम फुटाणे, गणपती कांबळे, अखलाक मेंडके, श्रीराम घोडके, संजय देशमुख, तुळशीदास जमाले, राजश्री थोरात, किसान पवार, सतीश सोमाणी, लिंबराज साळंुके, श्रीराम सूर्यवंशी, तानाजी जगदाळे, बबिता कोळगे, सुधीर गायकवाड, अर्जुन बोणे.

शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल?
सर्व पक्षीय एकवटले असल्याचा दावा करण्यात येत असला तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी मात्र शिवसेनेचा पॅनल स्वतंत्र असल्याचे जाहीर केल्याने सर्वपक्षीय आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. सर्वपक्षीय आघाडीमधील शिवसेनेचे उमेदवार अधिकृत नव्हेत का, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्यावेळी सोबत, आता आमनेसामने
उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून पॅनल उभा केला होता. त्यात काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला १४ जागा मिळाल्या होत्या. विरोधात असलेल्या शिवसेना-भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. गेल्या वेळी एकत्रित लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष यावेळी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.