आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी उद्घाटनास पालकमंत्री यांना बोलवण्यावरून खडाजंगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्मार्टसिटी योजनेच्या उद्घाटनाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना बोलवायचे की नाही, या मुद्द्यावरून बुधवारी वादाला तोंड फुटले. महापालिका पदाधिकारी आणि भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्यात खडाजंगी झाली. शेवटी त्यावर तोडगा काढण्यात आला. महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले. २५ जून रोजी सकाळी दहा वाजता किल्ला बाग येथे योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

दरम्यान, हा कार्यक्रम महापालिकेचा असल्याने उद्््घाटनही महापौरांच्याच हस्ते करणे ठीक नाही. त्याऐवजी शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री, दोन्ही खासदार, आमदार यांना बोलवावे. महापौर यांनी स्वागताध्यक्ष किंवा विनीत रहावे, असे मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले.

स्मार्ट सिटी उद्घाटन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी महापौर सुशीला आबुटे यांच्या कक्षात महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी महापौर आबुटे, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्यासह मनपा पदाधकारी, अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित हाेते. अमृत योजनेतून सहा बागांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे सादरीकरण मनपा आयुक्त काळम-पाटील यांनी केले. त्यात काही बदल सूचवण्यात आले.

उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे याबाबत चर्चा सुरू झाली. सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी महापौर आबुटे यांच्या हस्ते उद््घाटन करावे असे सुचवले. नगरसेवक जगदीश पाटील यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करा असे सुचवले. त्यावर बेरिया यांनी पालकमंत्री त्यादिवशी पुण्याला जाणार आहेत का त्यांना विचारा, आल्या नाहीत तर नागरिकांत गैरसमज होईल, असा मुद्दा उपस्थित केला. याबाबत प्रा. निंबर्गी यांना विचारण्यात आले. निबंर्गीयांनी सत्ताधाऱ्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर आक्षप घेतला.

प्रा. निंबर्गी म्हणाले, प्राेटोकाॅलमध्ये बसत असेल तर बोलवा. पालकमंत्र्यांना काॅर्नर करत असाल तर राजकारण कसे करायचे हे आम्हालाही माहीत आहे. माझ्या मागे काय चर्चा झाली त्याच्याशी माझे देणे घेणे नाही. आम्हीही जशाच तसे उत्तर देऊ. त्यावर मनपा आयुक्त आणि महापौर यांनी पालकमंत्र्यांना कार्यक्रमास बोलवण्याचे निश्चीत केले. याशिवाय खासदार अॅड. शरद बनसोडे, अामदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तीना निमंत्रण देण्याचे बैठकीत ठरले.

खासदार मोहिते यांना निमंत्रण नाही
स्मार्ट सिटी उद्घाटन कार्यक्रमास खासदार विजयसिंह मोहिते यांना निमंत्रण द्यावे, अशी सूचना उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी केली. ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना उपस्थित ठेवणे शोभणार नाही, असा मुद्दा नगरसेवक जगदीश पाटील यांनी उपस्थित केला.
बातम्या आणखी आहेत...