आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिवळा रंग घालवण्यासाठी अतिरिक्त प्रक्रियेचे प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मळीमुळे पिण्याच्या पाण्याला आलेला पिवळसर रंग घालवण्यासाठी नवी रासायनिक प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. त्यामुळे पाण्याचा पिवळसरपणा कमी झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे.

शहराला पुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाण्यात साखर कारखान्यातील मळी मिसळली गेली. महापालिकेच्या सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जात होती. मात्र, पाण्याचा रंग घालवता आला नाही. त्यामुळे आता पुणे महापालिकेच्या प्रयोगशाळेच्या सल्ल्यानुसार नवी रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. यामुळे रंग कमी झालेला आहे, असे नगरसेवक कृष्णहरी दुस्सा यांनी सांगितले.

बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांची सोरेगाव येथील केंद्राला भेट
पिवळसरपाण्याबाबत महापौर प्रा. आबुटे यांनी शुक्रवारी बैठक घेऊन आढावा घेतला. प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी पिवळसरपणा कमी झाल्याचे सांगितले. यावेळी सभागृह नेता संजय हेमगड्डी, स्थायी समिती सभापती पद्माकर काळे आदी उपस्थित होते. त्यानंतर महापालिका आयुक्तांसमवेत सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी अश्विनी जाधव, सुरेश पाटील, नागेश वल्याळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी केली कानउघाडणी
शहरात पिवळसर पाणी येत असताना आपण काय काम करता, नागरिकांना असे पाणी द्यायचे कसे. मळी सोडणाऱ्यांना अभय का देता, ते शोधा. शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी दिले पाहिजे असे म्हणत प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे केली. यावेळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक अमर पुदाले, संजय कोळी आदी उपस्थित होते.

पॉली अॅल्युमिनियम क्लोराइडचा वापर
पाण्याचा पिवळसरपणा कमी करण्याबाबत महापालिकेने पुणे महापालिकेच्या प्रयोग शाळेतील अधिकारी आर. बी. क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी गुरुवारी पाण्याची तपासणी करून पॉली अॅल्युमिनियम क्लोराइडचा (पीएसी) वापर करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे रासायनिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. ताशी १४ किलो असे एका दिवसाला ३३६ किलो ‘पीएसी’ वापरल्याची माहिती केंद्राने दिली. ही पद्धत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका वापरत आहे. पूर्वी सोलापूर महापालिकाही वापरत होती.

शुक्रवारी पाण्यात पिवळसरपणा नव्हता
^पाण्यातील पिवळसर कमी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील होती. पाण्यावर प्रक्रिया करून ते कमी केले. शुक्रवारपासून शहरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येत आहे.'' विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त,महापालिका, सोलापूर

घेतले हाती, पाणीपुरवठा एक दिवस पुढे
टाकळी-सोरेगावदरम्यानची जलवाहिनी २९ डिसेंबरला फुटलेली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा रविवारपासून एक दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे. ही स्थिती बुधवारपर्यंत राहील. त्यानंतर पुढील दोन-तीन दिवस पाणी उशिरा, कमी दाबाने कमी वेळ राहील, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कळवले आहे. याच काळात टाकळी पंप हाऊस, नांदणी बीपीटीजवळ गळती दुरुस्ती, टाकळी सोरेगाव येथील विद्युत यंत्रणेचे काम करण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम सुमारे १८ तास चालणार आहे.
बातम्या आणखी आहेत...