आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवसाचे रेल्वेमंत्री झालात तर काय उपाययोजना कराल, प्रभुंचा कर्मचाऱ्यांना प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेत नानाविध प्रयोग राबवणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आता थेट रेल्वे कर्मचाऱ्यांना साद घातली आहे. रेल्वेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी ‘कर्मचाऱ्यांनो, तुम्ही जर एक दिवसाचे रेल्वेमंत्री बनाल तर रेल्वेत काय बदल कराल?’ असा प्रश्न त्यांनी देशातील सुमारे १३ लाख कर्मचाऱ्यांना विचारला आहे.
कर्मचाऱ्यांनीदेखील प्रभूंच्या या प्रश्नाला चांगला प्रतिसाद दिला असून लाखो कर्मचाऱ्यांनी आपली मते, सूचना मांडण्यास सुरुवात केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची मते निवडली जातील ते कर्मचारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व विभागांना, झोनला आपली मते व सूचना मांडण्यास सांगितले आहे. २५ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील सूरजकुंड येथे तीनदिवसीय रेल्वे कर्मचाऱ्यांचे रेल विकास शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सर्वच रेल्वे विभागांना सूचना पाठविणे अनिवार्य केले आहे. आतापर्यंत देशातून दोन लाख सूचना रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचल्या आहेत. सूचनांसाठी दोन प्रश्न निवडण्यात आले आहेत. पहिला - तुम्ही जर रेल्वेमंत्री बनाल तर काय कराल? आणि दुसरा - प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी काय करायला हवे ? या दोन्ही प्रश्नांना कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सूचना देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शिबिरात या गोष्टीवर होणार चर्चा
Áरेल्वेच्या विकासासाठी येत्या दहा वर्षांत ८ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्याचा अॅक्शन प्लॅन काय असावा? रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर करण्यासाठी आणखी काय करायला हवे?
Áरेल्वेची गती वाढविणे, गाड्या वेळेवर धावणे, स्थानकावर स्वच्छता राखणे आदींसाठी काय करावे?
Áप्रवासी भाड्यात वाढ न करता पुढील ५ वर्षांत रेल्वेचे उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढविले जाणार आहे. यातून देशातील १०० प्रमुख रेल्वेस्थानकांचा विकास केला जाणार आहे. या प्रमुख विषयावर चर्चा केली जाणार आहे.

२२ ऑक्टोबरपर्यंत सूचना मांडा
^रेल्वेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कर्मचाऱ्यांकडून कल्पना, सूचना मागवल्या आहेत. रेल्वेच्या वेबसाइटवर या सूचना मांडण्यात येत आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या या उपक्रमास कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत सूचना मांडता येतील.
नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.
बातम्या आणखी आहेत...