आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीचे सांस्कृतिक संचित भक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचा दिवस म्हणजे भव्य कल्पनाविलास आणि प्रसन्न आणि ओजस्वी भाषावैभव असणारे कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन होय. हा दिन म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा यांचे प्रतीक असलेला तसेच मराठी मायबोलीचे वैभव वाढवणारा मराठी भाषा गौरव दिन होय. 
 
सायबरच्या जगात,परप्रांतीयांच्यालोंढ्यात, इंग्रजीच्या विळख्यात, रिमिक्सच्याही युगात....दिमाखदार शैलीत उभी माझी, माय मराठी, बाप मराठी, मुलुख मराठी, मी मराठी... 
मराठी भाषा इतर अर्वाचिन देशी भाषांप्रमाणे अकराव्या शतकात जन्मली. मराठीच्या प्राचीन स्वरूपाची खरी चाहूल पुरातन काळापासून चालत असलेल्या लोकवाङ््मयातून लागू शकेल. आद्यकवी मुकुंदराज यांचा विवेकसिंधू कित्येक पिढ्यांपासून अभ्यासला जात आहे. संत शिरोमणी एकनाथ महाराज हे पैठणचे. इथंपैठणी आणि ओव्या तितक्याच प्रिय. दासोपंतांची पासोडी, ज्ञानियांची ज्ञानेश्वरी, नाथांचे भागवत, रामदासांचा दासबोध हे सारं म्हणजे मराठी भाषेचं महावस्त्र होय. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, असं अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची हीच आपली अमृतमय मराठी, असे सांगताना अनेक लेखक आणि कवींचेही उर अभिमानाने भरून येतात. पण दुसरीकडे काही उच्चशिक्षित शहरी माणसे मराठीविषयी सहासनुभूती व्यक्त करताना म्हणतात की, ‘आपले थॉट्स आपल्या मदरटंगमधून जेवढे क्लिअरली एक्स्प्रेस करता येतात, तेवढे ते इतर लँग्वेजमध्ये करता येत नाहीत.’ अशी वाक्यरचना होत असेल तर मराठी भाषेचे भवितव्य काय? हा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. 

पण महाराष्ट्रातील ज्यांना राजकीय-सामाजिक- संास्कृतिक संदर्भ होता, अशी काही भाषिक स्थित्यंतरे झाली. त्यापैकी काहींनी मराठी भाषेचा भूतकाळ पूर्णपणे नाकारला, तर काहीनी या भूतकाळातील चांगला अंश वर्तमानकाळात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही कृतीमुळे मराठी भाषेला नवा चेहरा प्राप्त झाला. ग्रामीण, दलित साहित्य नवसाहित्य अशा व्यापक क्षेत्रात मराठीने प्रवेश केला वाङ््मयाला नवीन वाटा दाखवल्या. 

या साहित्याच्या जडणघडणीचा महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबरच वारकरी महानुभव संप्रदाय यांचाही मोठा प्रभाव आहे. या संप्रदायांनी, मराठी समाजाची, मराठी मनाची आध्यात्मिक जडणघडण व्हावी म्हणून मराठी भाषेतूनच साहित्यनिर्मिती केली. शाहिरांनी तर डफ आणि तुणतुण्याच्या नादावर मराठी भाषा नाट्यमय बनवली. लावणी, पोवाडे या शाहिरी वाङ््मयांची निर्मिती करून मराठी भाषेतील लावण्या आणि शृंगार प्रकट केला. रसिकांच्या हृदयावर आनंद खुलवत ठेवणाऱ्या या मराठीसाठी म्हणावेसे वाटते की, ‘मातृभाषेसाठी संघर्ष करणे म्हणजे एक दुर्गम अवघड डोंगर घाट, पण याच मातृभाषेविना काेण दाखविल वाट...’ 

आता महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे आपल्या या मातृभाषेच्या विकासापुढील आव्हाने. मराठी भाषेवर होणारे इतर भाषांचे आक्रमण, इंग्रजी शाळेत आपला मुलगा शिकला पाहिजे, अशी मराठी माणसाची वाढती मानसिकता. आज मराठी वाचकांची संख्याही रोडावत चालली आहे. शिक्षणाबरोबरच मराठी साहित्यही अधोगतीला जाते काय अशी भीती निर्माण झालेली आहे. ‘माझ्या मराठीची बाेलु कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके,’ हा ज्ञानेश्वरांनी सांगितलेला मराठीचा गोडवा पुढच्या पिढीला अनुभवताच येऊ नये, आमचे पुल, वपु, गदिमा यांसारख्या दिग्गज लेखकांना त्यांना भेटता येऊ नये? 

अखेर मराठी भाषा हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नाथांच्या भागवताची पैठणी नेसलेली, तुक्याच्या गाथेचा मुकुट मस्तकी लावलेली आणि ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा मळवट कपाळी लावलेली मराठी भाषा ही आमची मायबोली आहे. ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काल’, या उक्तीप्रमाणे तेजस्वी वैभवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेला ओजस्वी भविष्यकाळ लाभेल, हे निर्विवाद सत्य आहे. कवी उद्धव कानडे म्हणतात की, ‘इंग्रजी ही काळाची गरज आहे, म्हणून घाबरण्याचे कारण नाही. कुठलीही भाषा कुठल्याही भाषेला मारू शकत नाही. इंग्रजीबरोबर मराठीही राहणारच. तुझी माझी भेट झाली इंद्रायणी काठी... तू बोलता इंग्रजी, मी बोललो मराठी... आणि इंग्रजीचे पंख लावू, रोज नव्या शतकात जाऊ, मात्र चुकता कपाळावर मराठीचा टिळा लावू...’ 

मराठीचा झेंडा हजारो वर्षे सदैव असाच डौलाने फडकणारच यात शंका नाही. पुनश्च एकदा मराठी दिनाच्या शुभेच्छा... 
बातम्या आणखी आहेत...