आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: उळ्ळागडी चित्रपटात प्रशांत शिंगेची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : प्रशांत शिंगे
सोलापूर - पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये भाषा येत नसतानाही मानवतेचे दर्शन घडवणाऱ्या विषयावर मराठीत उळ्ळागडी हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटातील नवोदित कलावंत प्रशांत शिंगे यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कन्नड, मराठी आणि फ्रेंच अशा भाषांतून मानवी भाव टिपण्यात आलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाण्याची शक्यता आहे.

अभिजित पानसे यांनी रेगे चित्रपटानंतर उळ्ळागडी या चित्रपटावर काम सुरू केले आहे. दोन भिन्न स्वभाव संस्कृतीत वाढलेल्या व्यक्ती पुरात अडकतात आणि जीव वाचवण्यासाठी त्यांचा सुरू असलेला संघर्ष चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे. यातील व्यक्ती फ्रेंच असते तर मुलगी कन्नड, मराठी जाणणारी असते. भाषा येत नसतानाही त्यांच्यात मानवतेचे नाते जडते. असा चित्रपटाचा विषय आहे. मुलीच्या वडिलांच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक पानसे यांना कन्नड आणि मराठी जाणणारा कलावंत हवा होता. शिंगे यांना ऑडिशनसाठी मुंबईत बोलावण्यात आले. रंगभूमीवरील अनुभव पाहून शिंगे यांची निवड करण्यात आली. प्रशांत हे गेल्या अनेक वर्षापासून नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे. एकांकिका यांचे लिखाण आणि भाषांतराचे काम त्यांनी केले आहे.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चित्रपट श्रेष्ठ : उळ्ळागडीचित्रपटात पूर हा प्रमुख विषय आहे. त्यात जीव वाचवताना दोन व्यक्ती एका झाडाचा आधार घेत एकत्र येतात. संपूर्ण चित्रपट झाडावर चित्रित झालेला आहे. पुरात अडकलेली मुलगी ही कन्नड मिश्रित मराठी बोलत असते. तर व्यक्ती फ्रान्समधील असते. भारतात पर्यटनासाठी आल्यानंतर पुरात अडकते. मराठी, कन्नड आणि फ्रेंच असे संवाद चित्रपटात आहेत. संकटाचा सामना करताना मानवतेचे दर्शन दाखवण्यात आलेले आहे. चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य आणि शब्दाविना केले जाणारे संवेदनांचे आदान प्रदान यावर विशेष काम करण्यात आलेले आहे. मुळात एकांकिकेच्या स्वरूपाने उळ्ळागडी ही कथा सादर झाली. त्यानंतर पानसे यांनी त्याचा चित्रपट करण्याचे ठरविले.

उत्तम संधी मिळाली
गेली अनेक वर्षे नाट्य कलावंत म्हणून काम करतो. मोठ्या बॅनरच्या चित्रपटात काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. चित्रपटाचे चित्रण गंगा नदी क्षेत्रात झालेले आहे. संपूर्ण चित्रपटात संघर्ष दाखवण्यात आलेला आहे. माझी भूमिका मी प्रामाणिकपणे केली आहे. वेगळ्या कथेच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे. प्रशांत शिंगे, कलावंत