सोलापूर- माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्कारानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सप्टेंबर रोजी सोलापुरात येत आहेत. त्याबाबत अधिकृत दौरा महापालिकेकडे आला आहे.
महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन श्री. शिंदेसह अन्य काहींच्या सत्काराचा ठराव पालिका सभागृहात एकमताने केला. त्यानुसार कार्यक्रम होत आहे. याच्या नियोजनासाठी महापालिकेत साेमवारी सत्कार समितीची बैठक झाली. श्री. शिंदे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते, अॅड. शरद बनसोडे, आमदारप्रणिती शिंदे आणि सुभाष देशमुख यांना मानपत्र देण्यात येणार आहे.
राष्ट्रपती मुखर्जी यांनी निमंत्रण स्वीकारले असून येणार असल्याची माहिती महापालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी दिली. कार्यक्रमासाठी राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसा ठराव महापालिका सभागृहात झाला आहे.
इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार कार्यक्रम
सत्कार समितीची बैठक महापालिकेत सोमवारी महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समारंभ इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियम येथे करण्याचे ठरले. त्यासाठी उपसमिती नेमण्यात आली. यात शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असणार आहे, अशी माहिती मनपा सभागृह नेते हेमगड्डी यांनी दिली.